
हलकर्णी : बैठकीत आमदार शिवाजी पाटील यांचा सन्मान करताना तानाजी गडकरी व माजी आमदार राजेश पाटील. शेजारी गोपाळराव पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
अथर्व - दौलत साखर कारखान्याच्या समस्या बाबत मंगळवारी (दि. ११) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून या साखर कारखान्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळवण्याचा माझा प्रयत्न आहे, शेतकरी तसेच कामगार यांच्यावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार शिवाजी पाटील यांनी दिली.
हलकर्णी (ता. चंदगड) येथे अथर्व - दौलत विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे, मल्लिकार्जुन मुगेरी, माजी पंचायत समिती सभापती शांताराम पाटील, बबन देसाई, दीपक पाटील, नामदेव पाटील, उदयकुमार देशपांडे, रवींद्र बांदिवडेकर, भरमाना गावडा, दिग्विजय देसाई, तानाजी गडकरी उपस्थित होते.
आमदार शिवाजी पाटील म्हणाले, साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांबरोबर कामगारांनाही न्याय मिळाला पाहिजे. कामगारांचे वेतन, वेतनवाढ, बोनस हे त्यांना वेळेवर मिळाले पाहिजेत. मी शेतकरी व जनता यांच्या सोबतच नेहमी आहे.
माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, दौलत साखर कारखान्यामध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी शेतकरी व कामगारांना न्याय देण्यासाठी सर्व नेत्यांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र या.
यावेळी विविध समस्यावर झालेल्या चर्चेत गोपाळराव पाटील, लक्ष्मण गावडे, उदयकुमार देशपांडे, मल्लिकार्जुन मुगेरी, माजी पंचायत समिती सभापती शांताराम पाटील, बबन देसाई यांनी भाग घेतला.
No comments:
Post a Comment