![]() |
| माडखोलकर महाविद्यालयातील ‘आरंभ 1.0’ उत्सवा प्रसंगी बोलातना प्रा. ॲड. डॉ. एन. एस. पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये अकरावी व बारावीच्या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आरंभ 1.0’ या आगळ्यावेगळ्या, नाविन्यपूर्ण व विद्यार्थीकेंद्रित उपक्रमास विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे संपूर्ण महाविद्यालयीन परिसर उत्साह, रंग, ताल आणि सर्जनशीलतेने भारावून गेला होता.
या बहुआयामी स्पर्धात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक व ऑडिटर, प्रा. ॲड. डॉ. एन. एस. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनपर भाषणात बोलताना प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून अत्यंत प्रेरणादायी व विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, “आजचा विद्यार्थी केवळ परीक्षाभिमुख न राहता बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा असणे काळाची गरज आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कला, क्रीडा, लोकसंस्कृती, अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेचे संस्कार विद्यार्थ्यांवर रुजले तरच समाजाला संवेदनशील, जबाबदार व आत्मविश्वासपूर्ण नागरिक मिळू शकतात.”
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आरंभ 1.0 सारखे उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवात आहे. अशा उपक्रमांतून नेतृत्वगुण, संघभावना, आत्मविश्वास, मंचावर व्यक्त होण्याची क्षमता आणि निर्णयक्षमता विकसित होते. ग्रामीण व तालुकास्तरीय विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता दडलेली असून तिला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षणसंस्थांनी करणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी मांडले.
महाविद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक करत, अशा उपक्रमांची परंपरा सातत्याने सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव, इंजिनिअर एम. एम. तुपारे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी महाविद्यालयातील उपक्रमशील वातावरणाचा गौरव करत, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कला-संस्कृतीची जोपासना महत्त्वाची आहे. ‘आरंभ 1.0’सारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ठरतात,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. त्यांनी ‘आरंभ 1.0’ या संकल्पनेमागील भूमिका विशद करत, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि सकारात्मक स्पर्धेची भावना जोपासणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए. डी. कांबळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. एम. एम. माने यांनी केले. कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या मेंदी, लोकनृत्य, चित्रकला व ग्रीटिंग कार्ड अशा विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. मेंदी स्पर्धेत शुभम कांबळे (धनंजय विद्यालय, नागणवाडी) प्रथम, सानिका संतोष परीट द्वितीय, तर सभीया मुस्ताक आघा (न. भा. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगड) तृतीय क्रमांकावर राहिली.
लोकनृत्य स्पर्धेत राजेंद्र शिंदे कॉलेज, तुपारे/कारवे यांनी प्रथम, वैष्णवी औंधकर (न. भा. पाटील ज्युनिअर कॉलेज, चंदगड) द्वितीय, तर पुष्पा पाटील व शमिता शिंदे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धेत सारंग कोरे, सात आघा व सायली जुवेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले. ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत हर्षा शिरवळकर व समृद्धी तुपारे (धनंजय विद्यालय, नागणवाडी) प्रथम, रवीना गावडे द्वितीय, तर अभिनव घुरे व दीक्षा मल्हारी तृतीय क्रमांकावर राहिले.
या स्पर्धांचे परीक्षण डॉ. एन. के. पाटील, डॉ. आर. के. कमलाकर, डॉ. आर्यन साळुंखे, डॉ. अंजली पाटील, प्रा. आर. व्ही. आजरेकर, प्रा. प्रदीप गवस, डॉ. बी. एम. पाटील, डॉ. के. एम. कमलाकर, डॉ. कांबळे, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ.एस. डी. गावडे,आदी मान्यवर परीक्षकांनी केले. यावेळी महाविद्यालयातील बीसीए चे सर्व विद्यार्थी,बहुसंख्य प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला नवी दिशा देणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि आनंददायी वातावरण निर्माण करणारा ‘आरंभ 1.0’ हा उपक्रम र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या परंपरेत एक उल्लेखनीय ठसा उमटवणारा ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment