चंदगड : सी एल वृत्तसेवा / संपत पाटील दि. २०-१२-२०२५
चंदगड सारख्या छोट्या नगरपंचायत निवडणुकीत थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभा प्रचार सभा घेऊन राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या चंदगड नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रविवारी (ता. २१) लागणार आहे. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या मोजणी तासाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपंचायत वर झेंडा कुणाचा याबद्दल गत १९ दिवस उत्कंठा लागून राहिली आहे. हा निकाल आता काही तासावर येऊन ठेपला आहे. यासाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून ७२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तहसिलदार राजेश चव्हाण यांनी दिली.
येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर निकालासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येईल, ओळखपत्राशिवाय कोणालाही आज प्रवेश दिल जाणार नाही. सकाळी १० वाजता ९ टेबलवर २ फेऱ्यामध्ये मतमोजणी होईल. ओळखपत्राशिवाय कोणालाही आज प्रवेश दिल जाणार नाही.
मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात येण्याला मनाई करण्यात आली आहे. यासाठी मतमोजणी ठिकाणापासून दोन्ही बाजूला बॅरीकेट लावण्यात आले आहेत. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ८४.०८ टक्के मतदान झाले आहे. ८३१५ पैकी ६९९१ मतदारांनी मतदानाची हक्क बजावला आहे. आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे प्रचार सभा घेतल्याने चंदगडच्या निकालाकडे राज्याचे लक्ष आहे. नगराध्यक्ष पदासाठी ३ तर नगरसेवक पदासाठी ५७ उमेदवारांपैकी मतदारराजा कोणाला प्रसन्न होणार हे निकालानंतर समजेल. त्यासाठी रविवारी सकाळी दहा पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
भाजप शिवसेना युतीकडून सामाजिक कार्यकर्ते सुनिल काणेकर, राजर्षी शाहू आघाडीकडून सत्ताधारी नगराध्यक्ष प्राची काणेकर यांचे पती दयानंद काणेकर तर बसपा कडून श्रीकांत कांबळे हे नगराध्यक्ष पदासाठी निवडणुक रिंगणात आहे. या तीन पैकी मतदार कोणाला पसंती देतो हे उद्या निकालनंतरच स्पष्ट होईल.
राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेस या पक्षांसह मित्रपक्षाचे उमेदवार म्हणून दयानंद काणेकर यांनी निवडणुक लढवली आहे. दयानंद काणेकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीतील सर्व उमेदवारांसाठी माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, डॉ. नंदिनी बाभूळकर, संभाजीराव देसाई, एम. जे. पाटील यांनी ताकद पणाला लावली आहे. तर भाजप समर्थक विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाची युती करुन निवडणुक लढवली आहे.
शनिवारी सायंकाळीच मतमोजणी केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून रस्ता अडवून ठेवला आहे. मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्ही तसेच सीआरपीएफ पोलिसांच्या तुकड्या तैनात केले आहेत. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता चंदगड पोलीस घेत आहेत.

No comments:
Post a Comment