चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडच्या विद्यार्थ्यांनी चंदगड पोलिस स्टेशनला दिलेली शैक्षणिक भेट ही केवळ माहितीपुरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या मनात कायदा, शिस्त व समाजरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणारी ठरली. प्राचार्य आर पी पाटील यांच्या मार्गदर्शना खाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. २ जानेवारी १९५६ रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र पोलिस दल च्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम अर्थपूर्ण व प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला.
“सदरक्षणाय खलनिग्रणाय” हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवून समाजसेवा करणाऱ्या चंदगड पोलिस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी माहितीपर व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, तसेच उपनिरीक्षक शीतल धबाळे, कोळेकर व भिंगारदेवे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत पोलिसांच्या कार्याची ओळख करून दिली.
कार्यक्रमात महाराष्ट्र पोलिस दलाचा इतिहास व कार्य, दलाची स्थापना, जबाबदाऱ्या आणि समाजातील पोलिसांची भूमिका याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्व, तसेच नियमांचे पालन केल्याने होणारे फायदे यावर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगात अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या सायबर सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना मोबाईल व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाईन फसवणूक कशी ओळखावी याविषयी उपयुक्त माहिती देण्यात आली.
याशिवाय वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट, सीट बेल्ट व सिग्नल पाळण्याचे महत्त्व, तसेच आपत्कालीन परिस्थितीत 112/100 या क्रमांकांवर त्वरित मदत कशी मिळवावी याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले. प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन पोलिस अधिकाऱ्यांनी अत्यंत समजूतदारपणे केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोलिसांचे दैनंदिन कार्य, त्यांचा सेवाभाव व समाजासाठीचे योगदान जवळून समजले. कायदे, शिस्त व सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढून पोलिसांविषयी विश्वास, आदर व आपुलकी निर्माण झाली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार व कायद्याचे पालन करणारे नागरिक बनण्याचे आवाहन केले.
शाळा–पोलीस–समाज यांचा प्रभावी समन्वय साधणारा हा उपक्रम महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनाच्या उद्देशाला पूर्णतः साजेसा ठरला. कार्यक्रमास विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापक जे. जी. पाटील, संजय साबळे, टी. व्ही. खंदाळे, ओंकार पाटील, विद्या डोंगरे, विद्या शिंदे, साधना भोसले, प्रियाराणी बुरुड, भाग्यश्री पाटील, आकाश चव्हाण आदी शिक्षक उपस्थित होते. आभार जे. जी. पाटील यांनी मानले.

No comments:
Post a Comment