सावित्रीच्या लेकींनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे – पूजा तुपारे, दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे बालिका दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2026

सावित्रीच्या लेकींनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे – पूजा तुपारे, दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे बालिका दिन उत्साहात साजरा

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा दि. ४-१-२०२६

        "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. आज स्त्रिया विविध क्षेत्रांत यशस्वीपणे आपले स्थान निर्माण करत असतील, तर त्यामागे सावित्रीबाईंच्या विचारांचीच प्रेरणा आहे. सावित्रीबाईंनी पेटवलेला स्त्रीस्वातंत्र्याचा जागर अधिक बळकट करत आजच्या स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे ठळक अस्तित्व निर्माण करणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल, " असे प्रतिपादन कन्या शाळेच्या अध्यापिका पूजा तुपारे यांनी केले.

        त्या दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनियर कॉलेज, चंदगड येथे आयोजित बालिका दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. पाटील होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय संजय साबळे यांनी करून दिला. अध्यापिका एस. पी. कोळी यांनी आजच्या स्त्रीस्वातंत्र्याचा विकास विविध प्रेरणादायी उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केला.

        विद्यार्थिनी संगीता यमकर हिच्या “मी सावित्री बोलतेय” या प्रभावी कथाकथनाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मानसी चौगुले व रसिका हदगल यांनी आपल्या मनोगतातून स्त्रीशक्तीचा आत्मविश्वासपूर्ण आवाज मांडला.

        कार्यक्रमात ग्रंथपाल शरद हदगल यांनी स्त्री विषयक ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन भरविले. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला जे. जी. पाटील, वर्षा पाटील, टी. व्ही. खंडाळे, व्ही. के. गावडे, ओंकार पाटील, साधना भोसले, प्रिया राणी बुरुड आ आकाश चव्हाण आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या डोंगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भाग्यश्री पाटील यांनी मानले. हा बालिका दिन कार्यक्रम विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वप्नांना बळ देणारा ठरला.

No comments:

Post a Comment