नियोजनबध्द अभ्यासातूनच यशाचा मार्ग - संजय साबळे, दुंडगे माध्यमिक विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2026

नियोजनबध्द अभ्यासातूनच यशाचा मार्ग - संजय साबळे, दुंडगे माध्यमिक विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        “परीक्षा केवळ यश-अपयशाचे मोजमाप नसून वर्षभर केलेल्या प्रयत्नांना योग्य दिशा देण्याचा तो महत्त्वाचा टप्पा असतो. नियमितपणे, नियोजनबद्ध पद्धतीने केलेले कष्ट विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवतात. योजनाबद्ध अभ्यासातून केवळ यशच नव्हे तर आत्मविश्वासही प्राप्त होतो,” असे प्रेरणादायी प्रतिपादन ज्येष्ठ मार्गदर्शक संजय साबळे यांनी केले. ते दुंडगे (ता. चंदगड) येथील माध्यमिक विद्यालय येथे आयोजित इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. जे. पाटील होते.

        प्रास्ताविक करताना डी. डी. होणगेकर यांनी दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा असल्याचे सांगत सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

संजय साबळे पुढे म्हणाले, “आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असे काहीही नाही. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसतो.”

    दहावीचे वर्गशिक्षक एन. टी. बेनके यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, शिस्त आणि चिकाटी यांच्या जोरावर उत्तुंग यश संपादन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींचा सहवास यांचा उल्लेख केला.

    गजेंद्र कांबळे, सुजल पाटील, सुबोध खन्नुरकर, श्वेता नौकुडकर, पुनम खन्नुरकर, शर्वरी गवेकर, संस्कृती गवेकर, अनुष्का खनुरकर, समृद्धी कोकितकर आणि भक्ती कन्नूरकर या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. टी. एस. पी. नंद्याळकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन वाय. बी. पाटील यांनी मांडले.

    संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या स्वप्नांची चमक आणि भविष्यासाठीचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण कष्ट आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर दहावीचे विद्यार्थी निश्चितच यशस्वी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment