माणगाव : ताम्रपर्णी नदीत स्वाभीमानीचे जलआंदोलन, काम मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे, १८ रोजी माणगावला बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2026

माणगाव : ताम्रपर्णी नदीत स्वाभीमानीचे जलआंदोलन, काम मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे, १८ रोजी माणगावला बैठक

माणगाव (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदीतील पाण्यामध्ये आंदोलन करताना स्वाभीमानीचे कार्यकर्ते.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        माणगाव (ता. चंदगड) येथे नवीन पुलाचे बांधकाम करावे, यासाठी सोमवारी (ता. १६) स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ताम्रपर्णी नदीत उतरुन जलआंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर बांधकाम विभाग व तहसिल कार्यालयाच्या वतीने पुलाची उभारणी करण्यासाठी व भूसंपादनासाठी  बुधवारी दि. १८ माणगाव ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांनी सदर आंदोलन मागे घेतले. 

     २०१७ साली ताम्रपर्णी नदीवरील माणगावच्या नव्या पुलासाठी ५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदर काम अद्यापही जैसे थे आहे. या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे जलआंदोलन केले. ताम्रपर्णी नदीत उतरून सार्वजनिक बांधकाम तसेच तहसील कार्यालयाच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. दीपक पाटील म्हणाले, केवळ वीस गुंठे भूसंपादन साठी दहा वर्षे कालावधी लागत असेल तर रस्त्यांची कामे आणि फुलांची कामे कशी होणार असा सवाल उपस्थित केला. 

    यावेळी माणगावच्या सरपंच रेणुका नरी, उपसरपंच सुनील सुरुतकर, माजी पं. स. सदस्य अनिल सुरुतकर, मारुती अर्जुनवाडकर, रवींद्र बेनके, गोपाळ गावडे, पांडुरंग पाटील, बळवंत फडके, विश्वनाथ पाटील, परसू कांबळे यांनी नदीतील पाण्यात आंदोलनास प्रारंभ केला. मात्र पोलिसांनी त्यांना त्वरीत बाहेर काढले.

    आंदोलनावेळी उपविभागीय अभियंता इप्तेकार मुल्ला यांनी याबाबत आवश्यक ती भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करू, बुधवारी ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊन भूसंपादनाचा प्रश्न त्वरित निकालीत काढू, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे चंदगड उपविभागाचे कनिष्ठ अभियंता विजयकुमार पाटील, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्रीनिवास भोगुलकर, सहाय्यक अभियंता मंगेश गावडे हे उपस्थित होते.  

     या आंदोलनावेळी काही काळ माणगाव पुलावर तणाव निर्माण झाला होता. आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. कोळेकर यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

No comments:

Post a Comment