चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड नगरपंचायतीचे नूतन नगराध्यक्ष सुनिल काणेकर यांच्या नेतृत्वाखाली चंदगड शहरात आजपासून १५ फेब्रुवारी २०२६ पासून नऊ ठिकाणी विहीर स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानात नगरसेवक-नगरसेविका, कार्यकर्ते तसेच शहरातील सजग नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला.
चंदगड शहरातील एकूण नऊ महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक विहिरींची स्वच्छता या मोहिमेअंतर्गत केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, सार्वजनिक पाणीपुरवठा स्त्रोत स्वच्छ व सुरक्षित ठेवणे तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता वाढवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या मोहिमेत विहिरींमधील गाळ, कचरा, प्लास्टिक साहित्य तसेच साचलेली घाण काढून टाकण्यात येत आहे. तसेच पुढील काळात नियमित देखभाल व स्वच्छता राखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे शहरातील पाणीपुरवठा अधिक स्वच्छ आणि सुरक्षित होऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले. स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment