सुंडी येथे बुधवारी १८ रोजी भव्य शेतकरी मेळावा, चंदगड काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2026

सुंडी येथे बुधवारी १८ रोजी भव्य शेतकरी मेळावा, चंदगड काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी


चंदगड / सी एल वृत्तसेवा

    चंदगड तालुक्यातील काजू उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय लागवड पद्धती आणि बाजारपेठेतील नव्या संधी यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कृषी विभाग व सोन पांढर सुंडी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १८ रोजी लक्ष्मी मंदिर परिसरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

     या मेळाव्यात काजू पीक लागवड, व्यवस्थापन आणि काजू बोंड उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर प्रा. ऋतुराज चव्हाण व्याख्यान देणार आहेत. काजू पिकाचे सुधारित वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रणाच्या प्रभावी उपाययोजना तसेच विक्री व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील संधी या सर्व बाबींवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सुंडी येथे बुधवारी भव्य शेतकरी मेळावा

अध्यक्षस्थानी झिम्माना निंगाप्पा पाटील राहणार असून, गडहिंग्लज विभागाचे कृषी उपविभागीय अधिकारी किरण पाटील, चंदगड तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हाण आणि कोवाड मंडळाचे कृषी अधिकारी राहुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सुंडी परिसर हा काजू उत्पादनासाठी पोषक असून, योग्य तंत्रज्ञान व शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ शक्य आहे. त्यामुळे हा मेळावा काजू उत्पादकांसाठी मार्गदर्शक ठरणार असून प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे. सुंडी व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभघ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment