सांखवाळच्या राधे कृष्णा एन्टरटेन्मेंटतर्फे चिपळूणमध्ये रंगणार ऐतिहासिक "गोवळकोटचा रणसंग्राम" महानाट्य - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2026

सांखवाळच्या राधे कृष्णा एन्टरटेन्मेंटतर्फे चिपळूणमध्ये रंगणार ऐतिहासिक "गोवळकोटचा रणसंग्राम" महानाट्य

 

गोवळकोटचा रणसंग्राम या ऐतिहासिक महानाट्यात भूमिका साकारणारे कलावंत, सोबत मार्गदर्शक राजाराम शिवाजी पाटील 



मडगाव : सी एल वृत्तसेवा 

  सांखवाळ (दक्षिण गोवा) येथील सरनोबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने नरवीर सरनोबत आनंदराव गोळे यांच्या २९३ व्या स्मृतिदिनानिमित्त एका ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. ०५ ऑक्टोबर १७३३ रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानुसार मराठ्यांनी सिद्धीला दिलेला पराक्रमी प्रतिकार आणि सरनोबत नरवीर आनंदराव गोळे व त्यांच्या १० बंधूंचे स्वराज्यासाठी दिलेले बलिदान अजरामर करणाऱ्या "गोवळकोटचा रणसंग्राम" या पहिल्या महानाट्याचे सादरीकरण चिपळूण, जिल्हा रत्नागिरी (महाराष्ट्र) येथे होणार आहे.  

  राधे कृष्णा एन्टरटेन्मेंट, सांखवाळ यांच्या वतीने आणि युवा नाट्य दिग्दर्शक व निर्माता अमित दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महानाट्य सादर केले जात आहे. हे नाट्य मंडळ शुक्रवार ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी मडगाव रेल्वेस्थानकावरून चिपळूण येथे प्रस्थान करणार असून शनिवार ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ०६ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सभागृह चिपळूण येथे नाट्य सादरीकरण होणार आहे.  

  या महानाट्यत गोमंतकीय कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग असून सांखवाळ गावच्या मराठमोळ्या रणरागिणी कलाकर्मी, शालेय विद्यार्थिनींसह जवळपास ५५ महिला व बालकलाकार या प्रयोगात समावेश आहे. गोमंतकातील मराठ्यांच्या नसानसात भिनलेली स्वराज्याविषयीची तळमळ आणि अतुट शिवप्रेम या नाट्य प्रयोगातून दिसून येणार आहे. या भव्य प्रवासात वर्ष ०१ ते वर्ष ७४ वयोगटातील कलाकार रत्नागिरीच्या भूमीत सादरीकरण करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत.  

  या फौजफाट्यात शिल्पा नाईक, भारती नाईक, अनुराधा नाईक, अनुजा नाईक, प्रणीता बोरकर, पार्वती बोरकर, अनघा नाईक, शर्मिला नाईक, कांचन नाईक, सुजाता नाईक, उर्मिला नाईक, रविना नाईक, अस्मिता नाईक, समीक्षा नाईक, कृतिका नाईक, अश्विनी दळवी, अवनी कदम, सुगंधा भोसले, सुनिता नाईक, शैला नाईक, प्रभावती नाईक, मृणाल कदम, शकुंतला चोडणकर, विधाता नाईक, अंकिता नाईक, सुचित्रा लोटलीकर, रिमा नाईक, विजया कोटया, सुशांत दळवी आणि तुषार नाईक व बाल कलाकार म्हणून कुमार बाळकृष्ण दळवी, सिद्धांत नाईक, कु. रोमा नाईक, कु. यशवी बोरकर, तस्वी नाईक, तनिका गावकर, अन्वी दळवी, दिशा नाईक, अध्या कदम, श्रावी नाईक, कुमार श्लोक नाईक, हेरंब नाईक, अमित दळवी आणि अमर दळवी हे विविध भूमिका साकारणार आहेत. याशिवाय नेपथ्य - अमर दळवी, प्रकाश योजना - सिद्धांत नाईक व तुषार नाईक, रंगभूषा - विशाल दळवी, 

पार्श्व संगीत - गणेश प्रसाद गोकटे यांचे आहे. या ऐतिहासिक महानाट्याचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment