![]() |
| बागीलगे व रामपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान आधारित 'फायलो डिव्हाइस' उपकरणाची माहिती देताना कंपनीचे तज्ञ व कृषी अधिकारी सोबत शेतकरी वर्ग |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानाद्वारे भात पिकाचे व्यवस्थापन विषयावर चंदगड तालुक्यातील बागीलगे व रामपूर येथे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला प्रयोग करण्यात आला आहे. ए आय द्वारे चालणारे उपकरण भात शिवारात शनिवार दि. २६/०९/२०२६ रोजी बसवण्यात आली. ही उपकरणे कंपनीने शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर मोफत पुरवली असून यासाठी चंदगड पंस. चे सभापती प्रा. विलास नाईक व रामपूरचे माजी सरपंच राजू शिवनगेकर यांनी पाठपुरावा केला.
बागीलगे व रामपूर या दोन गावांमध्ये भात पिकामध्ये प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बेंगलोर येथील ॲग्रीहॅक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (फायलो कंपनी) यांच्यामार्फत उपकरण बसवण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर वृषभ भगते, सेल्स ऑफिसर प्रशांत माळी, फिल्ड इंजिनिअर वर्धमान भांडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शासकीय प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चंदगड यांच्या वतीने सहाय्यक कृषी अधिकारी एस. डी. मुळे यांनी AI तंत्रज्ञानामुळे भात पिकाला पाणी व्यवस्थापन, हवामानाचा अचूक अंदाज, कीड व रोग नियंत्रण याबाबतची माहिती थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवर मिळणार आहे. त्यामुळे खत व औषधांचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होणार असून बागीलगे व रामपूर या दोन्ही गावांत एकूण ५० शेतकऱ्यांच्या शेतावर ही AI यंत्रे (फायलो डिव्हाईस) बसविण्यात आल्याचे सांगितले. विज्ञान युगात शेतातील पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अशा अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यास शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे. चंदगड तालुका भात पीक उत्पादनात अग्रेसर असून भाताचे दर्जेदार व अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या उपकरणाचा फायदा करून घ्यावा. असे आवाहन यावेळी पंचायत समिती चे सभापती विलास नाईक यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
AI उपकरणे बसवण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये ज्ञानेश्वर भुजंग पाटील, गोपाळ गोईलकर, शिवाजी पाटील, गणपत पाटील, राजू ईश्वर शिवणगेकर (रामपूर), अप्पाजी लक्ष्मण वर्पे, राजेंद्र जाधव, उत्तम पाटील, नामदेव गावडे आदींचा समावेश आहे. या अभिनव उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.

No comments:
Post a Comment