‘संधीचा शोध घेणे ही उद्योजकतेची पहिली पायरी’ - उद्योजक संदीप चव्हाण, माडखोलकर महाविद्यालयात ‘उद्योजकीय कौशल्ये आणि उद्योगाची यशोगाथा’ या विषयावर कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2026

‘संधीचा शोध घेणे ही उद्योजकतेची पहिली पायरी’ - उद्योजक संदीप चव्हाण, माडखोलकर महाविद्यालयात ‘उद्योजकीय कौशल्ये आणि उद्योगाची यशोगाथा’ या विषयावर कार्यक्रम

 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        “संधीचा शोध घेणे ही उद्योजकतेची पहिली पायरी आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्याबरोबरच ओळखींचे जाळे विस्तारले पाहिजे. आपल्याबरोबर इतरांचीही प्रगती व्हावी, अशी सकारात्मक भावना उद्योजकाच्या मनात असणे आवश्यक आहे. भांडवल गुंतवण्याची क्षमता, जोखीम पत्करण्याची तयारी, सातत्यपूर्ण शिक्षण व प्रशिक्षण आणि परिस्थितीनुसार बदल स्वीकारण्याची क्षमता या गुणांमुळेच उद्योजकतेच्या क्षेत्रात यश मिळवता येते,” असे प्रतिपादन र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक संदीप चव्हाण यांनी केले.

    चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘उद्योजकीय कौशल्ये  आणि उद्योगाची यशोगाथा’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने होते.

    चव्हाण पुढे म्हणाले की, उद्योजकाने परिस्थितीची जाणीव ठेवून प्रतिकूल परिस्थितीतही बदल स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करून अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करण्याचा संकल्प केला, तर यशाची दिशा निश्चित करता येते. उद्योजकतेकडे केवळ आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहता रोजगारनिर्मिती आणि इतरांच्या प्रगतीलाही हातभार लावणारे माध्यम म्हणून पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी इतिहास विभागाचे प्राध्यापक बी. जी. गावडे म्हणाले, “कोणतेही काम छोटे अथवा मोठे नसते. आपण जे काम करतो ते मनापासून केले पाहिजे. कामातून मिळणाऱ्या आनंदाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण काम करणे गरजेचे आहे.” विद्यार्थ्यांनी कामाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून सातत्याने प्रयत्न करत राहावे, असेही त्यांनी सांगितले.

    प्रारंभी विभागप्रमुख डॉ. सोनाप्पा गोरल यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा तसेच उद्योजकीय विश्वाचा आढावा घेतला.

    अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच उद्योजकतेच्या विविध संधींचा अभ्यास करून आपल्या कौशल्यांना योग्य दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले, तर आभार प्रा. सौ. पी. सी. देशपांडे यांनी मानले. यावेळी प्रा. महादेव गावडे, प्रा. युवराज हेरेकर, प्रा. शोभा आरबळी यांच्यासह वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment