चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने मेघा इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड, हलकर्णी एम.आय.डी.सी. यांच्या सामाजिक बांधिलकीतून दि. न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडला विविध शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. या साहित्य प्रदानाचा व कृतज्ञता सोहळा विद्यालयात उत्साहात पार पडला.
मेघा इंजिनियर प्रा. लि.च्या सीएसआर निधीतून गेल्या तीन वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्राला सातत्याने सहकार्य करण्यात येत असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वॉटर फिल्टर, दोन कुलर आणि दोन प्रोजेक्टर विद्यालयाला देण्यात आले. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी, अधिक सुखकर शैक्षणिक वातावरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित अध्ययनाचा अनुभव मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. पी. पाटील होते. यावेळी मेघा इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर सुबराव पाटील व एम.आर. मष्णू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी उद्योगविश्वाने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पुढे येण्याची गरज व्यक्त केली. यावेळी सुबराव पाटील म्हणाले की 'विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेले साहित्य हे केवळ साधन नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. उद्योगाची सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाची प्रगती यांची सांगड घातल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या अधिक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात,” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले .
विद्यालयाच्या वतीने मेघा इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनाचे व सर्व संबंधितांचे पर्यवेक्षक एस एल बेळगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment