चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने बुक्किहाळ खुर्दची जि. प. शाळा गाजली, तीन तास रंगला सांस्कृतिक कार्यक्रम; पालक, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2026

चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने बुक्किहाळ खुर्दची जि. प. शाळा गाजली, तीन तास रंगला सांस्कृतिक कार्यक्रम; पालक, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

बुक्किहाळ खुर्द : संजय पाटील, सी.एल. वृत्तसेवा

    गणेशोत्सवाच्या मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात बुक्किहाळ खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे अप्रतिम दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता पहिली ते पाचवीतील अवघ्या १३ विद्यार्थ्यांनी तब्बल तीन तास विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रंगमंच अक्षरशः गाजवला. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला पालक, ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

    कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच ज्योतिबा मारुती बिर्जे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी परशराम बिर्जे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश बिर्जे, सेवा सोसायटीचे चेअरमन एकनाथ शंकर बिर्जे, श्रीराम डेअरीचे चेअरमन कृष्णा देवाप्पा सांबरेकर, व्हाईस चेअरमन परशराम विठोबा बिर्जे, गोकुळ डेअरीचे चेअरमन विठ्ठल रामचंद्र बिर्जे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनम शंकर बेळगावकर, उपाध्यक्षा कविता राजाराम बिर्जे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दयानंद टक्केकर, उपाध्यक्ष अनिल बिर्जे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. केंद्रप्रमुख सागर खाडे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अध्यापिका ज्योती भरमू कांबळे यांनी शाळेने विविध क्षेत्रांत मिळविलेले यश तसेच विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शाळेसमोरील विविध समस्या सोडविण्यासाठी पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    एकशिक्षकी शाळेने दाखवली गुणवत्तेची झलक

मर्यादित विद्यार्थीसंख्या आणि एकशिक्षकी शाळा असतानाही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम शाळेने केले, हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक सादरीकरणाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमात माता पालकांनी सादर केलेली ‘मंगळागौर’ ही कलाकृती विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला कौटुंबिक आणि सांस्कृतिक वातावरणाची सुंदर जोड मिळाली.

    विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांकडून प्रोत्साहन

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावचे प्रतिष्ठित नागरिक गोविंद मारुती बिर्जे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किट दिले. शाळेच्या माजी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नीता नामदेव अमरोळकर यांनी विद्यार्थ्यांसाठी बास्कर पट्ट्या दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

मर्यादित विद्यार्थीसंख्या आणि एकशिक्षकी शाळेच्या विविध अडचणींचा बाऊ न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अध्यापिका ज्योती भरमू कांबळे यांचा विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. दशरथ आतवाडकर यांनीही कार्यक्रमाचे, पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी केंद्रप्रमुख सागर खाडे, देव वैजनाथ शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मनोहर नाईक, शिक्षक संघाचे सरचिटणीस, जुनी पेन्शन संघटनेचे कोषाध्यक्ष नितीन हुद्दार, जुनी पेन्शन संघटनेचे उपाध्यक्ष तानाजी तरवाळ, दशरथ आतवाडकर, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस राम कांबळे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि कला सादरीकरणाची क्षमता विकसित होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला ग्रामस्थांची मिळालेली दाद आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शाळा परिसर आनंद, उत्साह आणि अभिमानाने भारून गेला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन तानाजी तरवाळ व बी. एस. कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment