गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूका शिस्तबद्ध, शांततापूर्ण व सुरक्षितपणे पार पाडल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रशासनाचे केले अभिनंदन - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2026

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूका शिस्तबद्ध, शांततापूर्ण व सुरक्षितपणे पार पाडल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रशासनाचे केले अभिनंदन

 


कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा 

   कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव काळातील कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणुका अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुख पोलीस उपअधीक्षक सौ. सुवर्णा पत्की यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

   गणेश विसर्जनाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने केलेले नियोजन, बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, नागरिकांना दिलेले मार्गदर्शन तसेच विविध विभाग, गणेश मंडळे, स्वयंसेवक आणि नागरिक यांच्यामध्ये साधलेला समन्वय यामुळे विसर्जन सोहळा सुरळीतपणे पार पडला. समितीच्या अभिनंदनपत्रातही महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या जबाबदार, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ भूमिकेचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

    विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचे नियोजन, महिला व नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेले प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे समितीच्या वतीने नमूद करण्यात आले.

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याला साजेशी कर्तव्यनिष्ठा प्रत्यक्ष कृतीतून दिसून आली. असे गौरव नगर संघटनेचे राज्य अध्यक्ष सुबराव पवार व पदाधिकाऱ्यांनी यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी राज्य अध्यक्ष सुबराव रामचंद्र पवार, यांच्यासह राज्य कोषाध्यक्ष सुनील जाधव, सदस्य जयसिंग पाटील, विजयकुमार पोवार, मुबारक शेख, सुनील कानकेकर, अब्दुल सत्तार रिकीबदार, मनोहर जाधव, अप्पा नुले आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment