निरोगी हृदय म्हणजे निरोगी कुटूंब - तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, २९ सप्टेंबर जागतिक हृदय दिनविशेष - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2026

निरोगी हृदय म्हणजे निरोगी कुटूंब - तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, २९ सप्टेंबर जागतिक हृदय दिनविशेष

डॉ. बी. डी. सोमजाळ

तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

हृदय हा आपल्या शरीराचा अविरत कार्य करणारा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. प्रत्येक क्षणी शरीरातील विविध अवयवांना रक्त व ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हृदय करते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवणे म्हणजे आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेणे होय. निरोगी हृदय म्हणजे निरोगी कुटूंब निरोगी समाज असे विचार चंदगड तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ बी डी सोमजाळ यानी जागतिक हृदय दिनानिमित्य व्यक्त केले .

डॉ सोमजाळ पुढे बोलताना म्हणाले, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक ताण, धूम्रपान व तंबाखूचे सेवन यामुळे हृदयरोगाचा धोका वाढत आहे. यासाठी पुढील नियमांचे पालन सर्वांनी करायला हवे.


हृदय निरोगी ठेवण्यासाठी ८ सोपे नियम

 दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा नियमित व्यायाम करणे.

 आहारात फळे, भाज्या, कडधान्ये व संपूर्ण धान्याचा वापर वाढवणे.

 मीठ, साखर आणि अतितेलकट व प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे.

 धूम्रपान व तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळणे.

 वजन आणि कंबरेचा घेर नियंत्रणात ठेवणे.

 रक्तदाब, रक्तातील साखर व कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी करणे.

 ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन आणि पुरेशी झोप घेणे.

 डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेणे आणि स्वतःहून औषधे बंद न करणे.


 हृदयविकाराचा झटका - लक्षणे ओळखा

छातीत दडपण किंवा वेदना, अचानक घाम येणे, मळमळ, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा वेदना हात, खांदा, पाठ किंवा जबड्याकडे जाणे अशी लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

“छातीत दुखत आहे, पित्तामुळे दुखत असेल, थोड्या वेळाने ठीक होईल” असे समजून दुर्लक्ष करू नका. हृदयविकाराच्या प्रसंगी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते, चंदगड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात ECG काढण्याची सुविधा मोफत विनामूल्य उपलब्ध आहे, दरवर्षी नागरिकांनी हृदय रोगाचा धोका आधीच ओळखण्यासाठी रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, इत्यादी चाचण्यांची तपासणी करून घ्यावी, या सर्व चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्र मोफत विनामूल्य उपलब्ध आहेत त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती

 आजच्या दिवशी एक संकल्प करूया...

तंबाखू नाही, धूम्रपान नाही, नियमित व्यायाम करूया, संतुलित आहार घेऊया, रक्तदाब, मधुमेह व कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवूया आणि आपल्या हृदयाची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी डॉ. बी. डी. सोमजाळ (तालुका आरोग्य अधिकारी चंदगड) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment