
दुष्काळ ग्रस्त शेताची पाहणी करताना सरपंच ज्योतीताई खराडे,उपसरपंच शंकर पाटील व इतर सदस्य
कोवाड : सी.एल. वृत्तसेवा
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सांबरे तसेच परिसरातील भात, भुईमूग, नाचणी व ऊस पिकांवर पाण्याअभावी करपण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी पिके वाळू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सांबरे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.
गडहिंग्लज तालुक्यात पावसाची मोठी तूट असूनही तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात न आल्याबद्दल यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली. तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करण्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव केला असून, यासाठी लवकरच तहसीलदारांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सरपंच ज्योतीताई लक्ष्मण खराडे यांनी सांगितले.
उपसरपंच शंकर पाटील म्हणाले की, सध्या गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नसला तरी भविष्यात परिस्थितीचा विचार करून याबाबत निर्णय होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पीक पाहणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व शेतकऱ्यांनी पीक पाहणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामविकास अधिकारी दत्ता नाईक यांनी सांगितले की, परिसरातील शेतकऱ्यांनी पीक पाहणीसाठी ग्रामपंचायत क्लार्क, शिपाई, पोलीस पाटील तसेच कोतवाल यांच्याशी संपर्क साधावा. पीक पाहणी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून, ग्रामपंचायतीकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य देमजी पाटील, विद्याधर पाटील, विष्णू चव्हाण, तसेच सदस्या वैशाली नाईक, सुवर्णा पाटील, कमल कोले, विमल कांबळे, सुनीता नाईक यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment