सण, उत्सव व महापुरुषांच्या जयंती प्रसंगी फटाके व डॉल्बीचा अतिरेक टाळा - पो. नि. नामदेव शिंदे, लक्ष्मण गावडे फाउंडेशन आयोजित गणपती सजावट स्पर्धेचे चंदगड येथे बक्षीस वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2026

सण, उत्सव व महापुरुषांच्या जयंती प्रसंगी फटाके व डॉल्बीचा अतिरेक टाळा - पो. नि. नामदेव शिंदे, लक्ष्मण गावडे फाउंडेशन आयोजित गणपती सजावट स्पर्धेचे चंदगड येथे बक्षीस वितरण

 

चंदगड येथे घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, यावेळी उपस्थित फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे, जि.प. सदस्या राजश्री गावडे, विष्णू गावडे आदी 

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      अलीकडच्या काळात सण- उत्सव, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी, निवडणुकांमधील विजय आदी अनेक प्रसंगी फटाके व डॉल्बी चा अतिरेकी वापर सुरू आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. हे स्वतःहून थांबवण्याची मानसिकता समाजात नसल्याने आता पोलिसांना दंडुका दाखवावा लागणार आहे, असा इशारा चंदगडचे नूतन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिला. ते चंदगड येथे प्रणाम हॉटेलचे मालक व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे प्रणित लक्ष्मण गावडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित 'तालुकास्तरीय घरगुती गणपती सजावट स्पर्धा- २०२६' च्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे होते. यावेळी जि. प. सदस्या राजश्री गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेडेकर व व्यंकटेश गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना झांबरे गावचे आदर्श सरपंच विष्णू विश्राम गावडे यांनी फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री आदर्श गाव योजने अंतर्गत गावात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना गावाला शासनाकडून बक्षीस स्वरूपात एक कोटी पेक्षा अधिक रक्कम मिळाली असून याचा उपयोग गावातील विकास कामे करण्यासाठी होत असल्याचे सांगितले. 

    यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले ``ध्वनी प्रदूषणासह, हवा व प्लॅस्टिक प्रदूषणाचा त्रास निसर्गातील पक्षी, प्राण्यांसह मानव जातीला होत आहे. प्रदूषणाचे  दुष्परिणाम माहिती असूनही समाज याकडे दुर्लक्ष करत असून याचे गंभीर परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. प्लास्टिकचा अतिरेकी वापर, डॉल्बी, फटाक्यातून निघणारे कर्णकर्कश आवाज, विषारी वायू यामुळे कॅन्सर सारखे गंभीर व जीवघेणे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. हे थांबवायचे असेल तर सर्व सण- उत्सव पर्यावरण पूरक झाले पाहिजेत. याची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे फाउंडेशनच्या माध्यमातून झाली आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेतून बक्षिसाच्या निमित्ताने का होईना लोकांना प्रदूषण मुक्त सण उत्सव साजरा करण्याची सवय लागेल.`` असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त करत गावडे कुटुंबियांच्या कार्याचे कौतुक केले. 

      यावेळी लक्ष्मण गावडे यांनी या पुढील काळातही ही स्पर्धा अशीच सुरू राहील असे जाहीर केले. जि. प. सदस्य राजश्री गावडे यांनी केवळ गणेशोत्सवच नव्हे तर होळी दिवाळी हे सण सुद्धा फटाके मुक्त करण्यासाठी समाजाने संकल्प करावा असे आवाहन केले. यावेळी पत्रकार श्रीकांत पाटील (कालकुंद्री) यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या कालकुंद्री येथील घरातील गणपती सजावट शंभर टक्के प्लास्टिक मुक्त, पर्यावरण पूरक व गणेशोत्सव फटाके मुक्त केल्यामुळे चंदगड तालुक्यातील प्रथम क्रमांकासह जिल्हास्तरावर तिसरा व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकावल्याचे सांगितले.  

    यावेळी गणपती आरास सजावट स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीसे, सन्मान चिन्ह, मानपत्र व झाडाचे रोपटे देऊन गौरविण्यात आले.  स्पर्धेतील गटनिहाय विजेते पुढील प्रमाणे - 'पर्यावरण पूरक- गट प्रथम क्रमांक सौ प्राची विशाल पाटील (कालकुंद्री), द्वितीय क्रमांक- आदेश गावडे (झांबरे), तृतीय क्रमांक- ओमकार मुळीक (मजरे शिरगाव) उत्तेजनार्थ- विशाल पाटील, इंस्टाग्राम लाईक गट- प्रथम क्रमांक- विठ्ठल गावडे (बाजार कानूर), द्वितीय क्रमांक स्नेहल मर्चंदे (हेरे), सामान्य वर्गवारी गट- प्रथम क्रमांक शिवराज कुंभार (कुदनुर), द्वितीय रोहन येर्लेकर (बाजार कानूर), तृतीय क्रमांक- (विभागून) गजानन कोळसेकर (धुमडेवाडी) व श्रीकांत जाधव (सातवणे), उत्तेजनार्थ- मंजुनाथ गावडे (चंदगड), आदित्य वांद्रे (कोवाड) आनंद गावडे (पिळणी), उत्कृष्ट मूर्तिकार- सुभाष कुंभार.

   यास प्रसंगी पत्रकार विजयकुमार दळवी (तरुण भारत), संपत पाटील (संपादक सी एल न्यूज), संतोष सुतार (संपादक सी एल माझा), प्रकाश ऐनापुरे (महान कार्य), आदींसह स्पर्धेचे परीक्षक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ए. डी. कांबळे यांनी केले. सरपंच विष्णू गावडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment