चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यांमधील जलसंधारण व जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक पार पडली. बैठकीत तालुकानिहाय सुरू असलेली तसेच प्रस्तावित कामे, प्रलंबित प्रकल्प, बंधारे, पाणी साठवण क्षमता आणि सिंचन व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी कालवे, पाझर तलाव, बंधारे तसेच जलसाठ्यांशी संबंधित आवश्यक दुरुस्तीची कामे आणि नवीन कामांच्या प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी व योग्य वापर व्हावा आणि भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करता याव्यात, यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
प्रलंबित कामांमध्ये येणाऱ्या तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून कामांना गती देण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. मंजूर कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यांतील प्रत्येक भागापर्यंत सिंचनाची सुविधा पोहोचवून शाश्वत पाणी व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीला स्थैर्य देत शेतकऱ्यांना बळकटी देण्याचा या कामांचा उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
.jpeg)
No comments:
Post a Comment