घरगुती गणपती सजावट स्पर्धा : पर्यावरण पूरक गटात कालकुंद्री येथील श्रीकांत पाटील यांच्या घरातील सजावटीला प्रथम क्रमांक - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2026

घरगुती गणपती सजावट स्पर्धा : पर्यावरण पूरक गटात कालकुंद्री येथील श्रीकांत पाटील यांच्या घरातील सजावटीला प्रथम क्रमांक

  

श्रीकांत वैजनाथ पाटील, कालकुंद्री यांच्या घरी करण्यात आलेल्या गणपती सजावटीचे छायाचित्र.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      चंदगड येथील प्रणाम हॉटेलचे मालक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे फाउंडेशन चंदगड यांच्या वतीने सन २०२६ मधील गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या 'तालुकास्तरीय घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा' निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या 'पर्यावरण पूरक- गणेशोत्सव गटात' कालकुंद्री येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपक्रमशील शिक्षक व पत्रकार श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या घरातील सजावटीने चंदगड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

    श्रीकांत पाटील यांचे चिरंजीव विशाल व सुन सौ. प्राची विशाल पाटील यांच्या संकल्पनेतून ही सजावट करण्यात आली होती. पाटील कुटुंबीयांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही १०० टक्के प्लास्टिक मुक्त व फटाके मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच आरास सजावटीत 'घरोघरी ग्रंथालय' विषयावरील संकल्पनेतून वाचन संस्कृती वाढीसाठी ग्रंथ पुस्तकांची प्रभावी मांडणी व वाचनाचे महत्त्व, फायदे या सजावटीमधून विशद केले आले होते. गणेशोत्सव काळात ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी ग्रामस्थ व अनेक मान्यवरांनी पाटील यांच्या घरी भेट दिली होती. या कामी सौ. शोभा श्री. पाटील, वैष्णवी पाटील, दीपक पाटील आदी कुटुंबियांचे सहकार्य लाभले होते.

       तीन गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे -  पर्यावरण पूरक सजावट गट - प्रथम क्रमांक सौ. प्राची विशाल पाटील (कालकुंद्री), द्वितीय क्रमांक- आदेश गावडे (झांबरे), इंस्टाग्राम लाईक गट - प्रथम क्रमांक विठ्ठल गावडे (कानूर), द्वितीय क्रमांक स्नेहल मयांदे, उत्तेजनार्थ ओमकार मुळीक (मजरे शिरगाव), सामान्य वर्गवारी गट- प्रथम क्रमांक शिवराज कुंभार (कुदनुर), द्वितीय रोहन येळूरकर (कानूर), तृतीय क्रमांक विभागून गजानन कोळसेकर (धुमडेवाडी) व श्रीकांत जाधव (सातवणे), उत्तेजनार्थ- मंजुनाथ गावडे (चंदगड), आदित्य वांद्रे (कोवाड) आनंद गावडे (पिळणी), उत्कृष्ट मूर्तिकार - सुभाष कुंभार आदींचा समावेश आहे.

   स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत चंदगड येथे पार पडणार आहे.

No comments:

Post a Comment