वायफळ खर्चाला बगल देवून पर्यावरणपुरक गणेशोत्सव शिरगाव ग्रामस्थांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2018

वायफळ खर्चाला बगल देवून पर्यावरणपुरक गणेशोत्सव शिरगाव ग्रामस्थांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा

संपत पाटील, चंदगड

गणेशोत्सव म्हटले की पटकन लक्षात येते ते मंडळ. तालुक्यात शंभरहून अधिक मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. मात्र यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच मंडळे सामाजिक भान ठेवून उपक्रमशील गणेशोत्सव साजरा करतात. त्यापैकीच एक मजरे शिरगांव (ता. चंदगड) येथील सिध्दी विनायक महिला भजनी गणेश मंडळ होय. सहा वर्षापासून येथे एक गाव एक गणपती अंतर्गत सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होतो. यावर्षी मंडळाचे फटाके व अन्य खर्चाला बगल देवून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा केला. गणेशत्सव काळात मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले. यानंतरही गाव आमचे, आम्ही गावाचे याअंतर्गत लोकसहभागातून विविध उपक्रम वर्षभर राबविण्याचा त्यांचा मानस आहे. आज संपुर्ण गावात व्यसमुक्तींची प्रतिज्ञा घेण्यात आली.

    मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथील ग्रामस्थ व्यसनमुक्तीची शपथ घेताना. 
व्हीडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. शिरगाव ग्रामस्थ व्यसनमुक्ती प्रतिज्ञा



          चंदगड शहरापासून तीन किलोमीटरवर असलेले मजरे शिरगाव हे एक हजार लोकवस्तीचे गाव. या गावात सहा वर्षापूर्वी सिध्दीविनायक महिला भजनी मंडळाची स्थापना करण्यात आली. महिला मंडळाच्या अधिपत्याखालीच गावात सार्वजनिक गणेशाची स्थापना झाली. गणेश मंडळ व महिला मंडळाच्या बचतीतून यावर्षी गावातील लक्ष्मी सावळाराम सुतार, लक्ष्मी कृष्णा मांगले, सखु सटु मुर्डेकर, लक्ष्मी यशवंत दळवी, श्रीमती कांबळे या पाच गरीब कुटुंबांना गणेश मुर्ती दिल्या. याबरोबर महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तु दिल्या. मंडळाने केलेल्या मदतीमुळे या कुटुंबांनी पहिल्यांदा ओढाताण व उसनावर न करता गणेशोत्सव साजरा केला. मंडळामुळे या पाच कुटुंबियांनी गणेशाचे मंडळाच्या माध्यमातून अनोखे रुप पाहिले. त्यांना गणेशच पावला असे म्हणता येईल.
          आरती अर्जून सुतार या निराधार महाविद्यालयीन युवतीला आर्थिक मदत केली. राजकारण विरहीत मंडळाने काम करत असून गावच्या विकासासाठी आठवड्यातून एक दिवस गावात स्वच्छता करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. मंडळातील सदस्यांनी प्लॅस्टीकबंदी मोहिम राबवली आहे. व्यसनाधिनतेमुळे कुटुंबाची वाताहात होते. त्यामुळे गावातील महिला व पुरुषांनी गणेश मुर्ती प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी आम्ही तंबाखु, मद्यपान करणार नसल्याची प्रतिज्ञा घेतली. स्वच्छता, प्लॅस्टीकबंदी, व्यसनमुक्ती, महिला आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, लोकसहभागातून शाळा सुधारणा, गरीब कुटुंबांना आर्थिक मदत, अंगणवाडीतील विद्यार्थांना पोषण आहाराचे वाटप आदी उपक्रम या महिला गणेश मंडळाच्या वतीने केले जातात. यावर्षी मंडळाचे फटाके व डॉल्बीसारख्या अन्य खर्चाला फाटा देवून पर्यावरणपुरक गणेशाची स्थापना केली. गावच्या कोणत्याही कामात ग्रामस्थांची हिरीरीचा सहभाग असतो व त्यातून गावात असलेला एकोपा लक्षात येतो.

          गावच्या विकासात महिलांची सहभाग असल्याच ती कामे तडीस जातात असे विचार सुनिल सुर्यवंशी, बाबु सुर्यवंशी, महादेव सुर्यवंशी, राजेंद्र सामंत, विश्राम सासुलकर, गणपती वाके, महेश गावेड, ज्ञानेश्वर कुंदेकर, अनिल वाके, स्नेहा सुर्यवंशी, धोडीबाई गावडे, निता कुंदेकर आदीसह ग्रामस्थांनी या कार्यात सहभाग घेतला आहे.