शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे हे ऊस तुटल्यानंतर 14
दिवसात देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. यावर्षी जिल्ह्यात हुमणी, मावा व
अतिपावसामुळे ऊस उत्पादन घटणार आहे. त्यामुळे कारखानदार शेतकऱ्यांकडे ऊसासाठी मागे
लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाची घाई करू नये. ऊस दर निश्चित झाल्याशिवाय ऊसाचे
कांडेही कारखान्यांना पाठवू नये. आता कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही
असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे आयोजित
शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जयसिंगपूर येथे 27 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेचे निमंत्रण
देण्यासाठी ते आले होते.
खासदार श्री. शेट्टी पुढे म्हणाले,`` हे
सरकार लबाड आणि ढोंगी आहे. पेट्रोल,
डिझेल, व साखरेचे दर कधी चढवायचे व कसे कमी
करायचे त्यांना अवगत आहे. यामुळे जनतेची
फसवणूक होत आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी जाहिरातनाम्यात शेतकऱ्यांचा
सातबारा कोरा करू असे जाहीर करून आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करावी.``
पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना खासदार राजू शेट्टी, शेजारी प्रा. दिपक पाटील, जगन्नाथ हुलजी व इतर.
|
यावेळी भगवानराव काटे म्हणाले, ``कारखानदारावर
शेतकऱ्यांचा वचक रहायचा असेल तर ऊसदर आंदोलनात ऊसाचा बुडका हाताता घेवून
शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे. घामाचे दाम मिळवून देणारी एकच संघटना आहे आणि एकच
नेता आहे तो म्हणजे राजू शेट्टी.`` संघटनेचे राज्य
सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, ``शेतकरी संघटनेवर केवळ प्रेम करून भागणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धागा व्हा. जे कारखाने ज्यादा
दर देतील त्यांना ऊस द्या. मागील देय रकमेसाठी कारखाने बांधील आहेत. ते कसे वसूल
करावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.``
प्रा. दिपक पाटील
यांनी``चंदगडकरांचे सन 2010-11 सालचे तासगावकर यांच्याकडून व
न्युट्रीयन्सकडून लाखो रुपये थकीत आहेत. त्यामुळे येथील कारखानदारांना वाटते की
येतील शेतकरी पैसे दिले नाही तरी गप्प बसतो. पण हे पैसे कोठेही कोणालाही चुकणार
नाहीत.`` यावेळी
चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील महादेव निवगिरे यांचा एकरी 96 टन ऊस उत्पादन
काढल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, विष्णू
गावडे, विश्वनाथ पाटील, बाळाराम फडके, राजू पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अस्मिता पाटील, मारुती मेणसे, सुरेश कुट्रे, शशिकांत रेडेकर, राजू व्ह्टकर,
सतीश सबनीस, के. जी. पाटील, पिटु गुरव, विलास झाजरी, विलास पाटील यांच्यासह शेतकरी
उपस्थित होते.
शेतकरी संघटना ठरवणार तोच दर द्यावा लागणार........
शेतकऱ्यांचा पुळका म्हणून काही लोक ऊस परिषद
घेत आहेत. हि ऊस परिषद म्हणजे नायकीनीनं केल, म्हणजे जोगतीनीनं करायलाच पाहिजे
अशातला प्रकार आहे. पण शेतकरी संघटना ठरवेल तोच दर कारखान्यांना द्यावा लागेल. त्यामुळे
शेतकऱ्यांनी कोणत्या ऊस परिषदेला जावे हि ठरविण्याची वेळ आली आहे.