'चंदगड नगरपंचायत निवडणूक २०२५' आज अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने आपला अर्ज माघार घेतलेला नाही. अशी माहिती निवडणूक विभाग तहसील कार्यालय चंदगड यांच्याकडून कळविण्यात आली आहे. माघारी साठी अजून तीन दिवस असल्याने त्यानंतरच किती उमेदवार आपली उमेदवारी माघार घेणार हे स्पष्ट होणार आहे. पहिल्या दिवशी तरी प्रत्येक जण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे चित्र आहे. पण अपक्ष उमेदवारीचे आव्हान पेलणे वाटते तितके सोपे नाही.
यंदाच्या निवडणुकीत पॅनल रचना बऱ्यापैकी स्पष्ट झाली असली तरी अद्याप उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास दोन-तीन दिवसांचा अवधी आहे. निवडणूक चिन्ह वाटप झालेले नाही. असे असताना हायटेक प्रचाराचे फंडे राबवले जात आहेत. बऱ्यापैकी सर्वच उमेदवारांनी आपल्या वार्डात थेट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन डेमोसह मतदान कसे करावे? आपले नाव बॅलेट मशीन वर किती नंबरला आहे? याबाबतची माहिती उमेदवारांच्या मनावर ठसवण्याचे नियोजन करून ठेवले आहे.
यासोबतच नेतेमंडळी आपापल्या पॅनल मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून कुणाकुणाला पाचारण करायचे? कोपरा सभा, पदयात्रा या नियोजनात मग्न आहेत. अर्ज माघारीच्या दिवसानंतर व निवडणूक चिन्ह वाटप नंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार असली तरी उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच उमेदवार पायाला चक्रे बांधून आपल्या वार्डात फिरताना दिसत आहेत.
दरम्यान तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, पोलिंग ऑफिसर प्रिसिंग ऑफिसर, कर्मचारी पथकाच्या ऑर्डर काढणे, मतदान यंत्रे अद्यावत ठेवण्याचे काम सुरू असल्याचे समजते.
दुसरीकडे प्रचाराचे बॅनर, माहितीपत्रक छपाई, झेंडे, स्कार्फ, बिल्ले, वाहतूक, जाहिरात संस्था आदी निवडणूक संबंधित यंत्रणांना सुगीचे दिवस आले आहेत.

No comments:
Post a Comment