मांडेदुर्ग शाळेतील विद्यार्थिनींनी बनवल्या स्वतः भाकरी, कष्टाच्या भाकरीची अनुभूती - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2025

मांडेदुर्ग शाळेतील विद्यार्थिनींनी बनवल्या स्वतः भाकरी, कष्टाच्या भाकरीची अनुभूती

  

मुलांच्या भाकरी बनवणे उपक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षक वर्ग

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      केंद्रशाळा मांडेदुर्ग (ता. चंदगड) शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने भाकरी बनवण्याचा अनुभव घेतला. मुख्याध्यापक व शिक्षकांनी शालेय अभ्यासक्रमातील कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला वाव देण्यासाठी आज बुधवार, दि. १९ रोजी वनभोजनाच्या निमित्ताने इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थिनींसाठी "माझी भाकरी" हा उपक्रम व स्पर्धा राबविली ती कमालीची यशस्वी ठरली.  

       पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण मिळाले पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून राबवलेल्या उपक्रमात मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांची विविध गटात विभागणी करून त्यांना हे कार्य दिले होते. गट प्रमुखांच्या नियोजनाप्रमाणे गटातील विद्यार्थ्यांनी भाकरी बनवण्यासाठी लागणारी भांडी, तवा, तांदूळ, ज्वारी, नाचणीचे पीठ, उलथने, पाणी आदी सामग्री  आपल्या सोबत वनभोजनाच्या ठिकाणी आणली होती. तिथे  परिसरातील दगड मांडून चुली बनवल्या. वाळलेली लाकडे जमा करून चुली पेटवणे पीठ मळणे. भाकरी भाजणे असा प्रत्यक्ष अनुभव घेतला. भाकरी ताटात येईपर्यंत हाताला चटके बसण्यासह किती अडचणींना सामोरे जावे लागते याची मुला मुलींनी प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.

        आपल्याला रोज वेळेत भाजी भाकरी तयार करून देणाऱ्या आपल्या आईच्या हाताला किती चटके बसत असतील? तिच्या कष्टाची अनुभूती सगळ्याना आली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाबरोबरच व्यवहारात लागणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला. शेवटी वनभोजनाच्या जेवणात मुलांनी स्वतः बनवलेल्या भाकरीची चव शाळेतील सर्वच मुलांना चाखायला मिळाली.

      यावेळी केंद्रप्रमुख आर. एस. पाटील, मुख्याध्यापक वैजनाथ पाटील, पदवीधर अध्यापक पी जे पाटील, अध्यापक शिवाजी पाटील, बी. एस. कांबळे, राम कांबळे, सुभद्रा पाटील, कविता पाटील, क्रांती चिंचनगी आदींनी उपस्थित राहून मुलांना मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीने या उपक्रमाचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment