चंदगड तालुक्याच्या किणी कर्यात भागात सुगीची धांदल - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2018

चंदगड तालुक्याच्या किणी कर्यात भागात सुगीची धांदल

                            कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शिवारात भात पिकांची मळणी काढताना शेतकरी.

  श्रीकांत पाटील, कालकुंद्री

तालुक्यात सर्वत्र सुगीचा हंगाम जारोत सुरु आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात विशेषतः तालुक्याच्या पुर्वेकडील कर्यात भागात भात मळण्यांची एकच धांदल उडाली आहे. मळण्यांच्या एकदम आलेल्या हंगामामुळे शेतकरी पैरा पध्दतीचा अवलंब करत असून अबालवृध्द सुगीच्या कामात व्यस्त आहेत.
गेल्या काही वर्षात नगदी पिक म्हणून भागातील बहुतांशी शेतकरी ऊस पिकाकडे वळले असले तरी कार्यात भागात भात पिकाचे प्राबल्य आहेच. याचे कारण म्हणजे भात काढणी नंतर मिळणारे मसूर, वाटाणा, हरभरा आदी कडधान्य व मोहरी, शाळू ही पिके त्यानंतर पुन्हा तिसरे पिक म्हणून पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी सुर्यफूल व जनावरांच्या उन्हाळ्यातील ओल्या चार्‍यासाठी मका घेतला जातो. हे फायदे ओळखून शेतकरी शेतीचा निम्मा भाग भात शेतीसाठी राखून ठेवतोच. याशिवाय भाताचे पिंजर व मसूर मळणीनंतर मिळणारा कोंडा (व्हाट) यामुळे जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्‍न सुटतो. एकंदरीत यावर्षी भात शेतीला पुरेसा पाऊस व हवामान यामुळे उतारा चांगला आहे. गेल्या आठवड्यातील अवकाळीने धास्तावलेल्या शेतकर्‍याला निरभ्र आकाश, उत्साह वाढवणारी थंडी व कोंडा उगवणीसाठी वारा उपयुक्त असल्यामुळे स्वतःच्या व पशुधनाच्या वर्षभराच्या बेगमीसाठी शेतकरी राजा सुगीच्या कामात गुंतला आहे. मात्र दूग्ध व्यवसायामुळे बैलांची संख्या रोडावल्यामुळे रबीच्या पेरण्यासाठी घाई करावी लागत आहे. जमिनीतील ओलाव्याचा फायदा घेवून मसूर, वाटाणा, हरभरा, गहू, शाळू आदी रबी हंगामातील पेरण्या केल्या जातात. मात्र सर्वच शेतकऱ्याची शेतीकामे एकदाच आल्याने बैलजोडी मिळेनाशी झाली असून बैल मालकांचा भाव वधारला आहे.  भात मळण्यांसाठी पारंपारीक जनावारांच्या सहाय्याने काढली जाणारी मळणी पध्दत बंद होवून आधुनिक पध्दतीने सर्रास ट्रॅक्टरचा वापर सुरु झाला आहे.