ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विज्ञान साधनांची माहिती घेताना विद्यार्थी. |
अशोक पाटील, कोवाड
अस्वच्छ परिसरामुळे आरोग्य धोकादायक, वाहतुकीला सुरक्षितता देणारी यंत्रणा, रेनी वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, टाकाऊ पासून टिकाऊ गरजेच्या वस्तू, लोकसंख्या शिक्षण, शेती क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, पर्यावरण शाळेची संकल्पना, मानवी उर्जाचा वापर करत वीजनिर्मिती आणि इतकेच नव्हे तर यासह सामाजिक, पर्यावरण विषयावर विविध प्रकल्पांचा सुरेख अविष्कार विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सादर केला, निमित्त होते, 44 वे चंदगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेवर विविध प्रकल्पांच्या सादरीकरणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दर्शन घडविले. प्रदर्शनात जीवनातील आव्हानासाठी वैज्ञानिक उपाय या विषयानुसार 127 प्रयोगाची मांडणी केली होती. चंदगड पंचायत समिती व ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयातर्फे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. बुधवारी (ता. 19) अणुसंशोधन केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिवराम यांच्या उपस्थितीत आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते. आज तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी प्रदर्शनाला भेट दिली. 12 वर्ग खोल्यातून उपकरणांची मांडणी केली होती. प्रयोग पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकाळपासून विद्यालयाच्या प्रांगणात रांगा लावल्या होत्या. स्वयंसेवक विद्यार्थी प्रयोग पाहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करत होते. प्रत्येक दालनात रांगेतून जाऊन विद्यार्थी व शिक्षकांनी प्रयोगाची कलाकृती समजून घेतली. प्राथमिक गटात 13, माध्यमिक गटात 39 व उच्च माध्यमिक गटात नववी ते बारावी 46 शाळांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक 6 व माध्यमिक शिक्षक 10, प्राथमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षण पाच, माध्यमिक शिक्षक लोकसंख्या शिक्षण तसेच तीन प्रयोगशाळा परिचर यांनीही उपकरणे मांडली होती. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संकल्पना मांडणारे सामुदायिक स्वास्थ्य व पर्यावरण, विज्ञान व गणित, ऊर्जा संसाधने, वाहतूक, दळणवळण, शेती, पाणी, आरोग्य या विषयावर प्रकल्पांचे उत्तम सादरीकरण केले होते. त्यामुळे रेन हार्वेस्टिंग, लोकसंख्या शिक्षण, पाण्याची बचत, पर्यावरण चुल, हवेवरील पाण्याची फवारणी, औषध फवारणी, पंप यासह विविध प्रयोग उपकरणांची मांडणी प्रदर्शनात केली होती, प्रश्नमंजुषा स्पर्धेत 32 शाळांनी सहभाग घेतला होता. प्राचार्य एस. आर. पाटील, गटशिक्षणाधिकारी एस. एस. सुभेदार, शेतकरी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, उत्तम पाटील, मधुकर बोकडे, जे. डी. धामणेकर, व्ही. आर. पाटील, ए. एस. ओऊळकर, ए. आर. जाधव, एस. जे. गावडे, एम. वाय. पाटील, व्ही. एन. पाटील, एन. जी. चांदेकर, एस. ए. पाटील, बी. एम हिरेमठ, किशोर गोसावी, तानाजी कांबळे, वैजनाथ कांबळे यांच्यासह परिसरातील शिक्षक प्रदर्शनाचे नियोजन करत आहेत.
अशोक पाटील, कोवाड प्रतिनिधी |
No comments:
Post a Comment