आंबेवाडीत गव्यांचा धुमाकूळ,दोन एकरातील ऊस खाऊन फस्त - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2019

आंबेवाडीत गव्यांचा धुमाकूळ,दोन एकरातील ऊस खाऊन फस्त

मजरे कार्वे / प्रतिनिधी
आंबेवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी मनोहर जानबा मुळीक यांचा सर्वे नंबर ४२ व ४५ मधील दोन एकर इतका ऊस गव्यानी फस्त केला. तिलारी मार्गावरील आंबेवाडी धरणाच्या जवळील शेतामध्ये  दीड महिन्यापूर्वी तुटलेल्या उसाचे दोन फुटापेक्षा जास्त खोडवे आले होते. या खोडव्यामध्ये गव्यांचा कळप घुसून संपूर्ण दोन एकरातील ऊस पिकाचे नुकसान केले आहे. याबाबतीत जंगमहट्टी सज्जा वरील तलाठी श्री पाटील यांनी सदर नुकसानीचा पंचनामा केला आहे. या नुकसानीची भरपाई संबंधित शेतकऱ्यास तात्काळ मिळावी अशी मागणी होत आहे. या परिसरामध्ये गवे, रान डुक्कर व हत्ती यामुळे शेती पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. गव्याच्या हल्ल्यात येथील शेतकऱ्यांचा मृत्यू ही झाला आहे. त्यामुळे पीक राखणीसाठी शेतकरी शेतात जाणेचे प्रमाण ही कमी झाले आहे. नुकताच या परिसरातून हत्तीचा कळप आजरा तालुक्याकडे गेला आहे. पिकांचे नुकसान होणे हे येथील शेतकऱ्यांना नित्याचे झाले आहे. त्यामुळे येथे शेती करणे शेतकऱ्यांना मुश्कील बनले आहे. या सर्वच प्राण्यांच्या मुळे होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment