चंदगड / प्रतिनिधी
रमेशराव रेडेकर फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपण दरवर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपतींचे गड कोट हीच त्यांची स्मारके आहेत. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाच्या अभ्यासाची ती साधने आहेत. त्यामधूनच महाराष्ट्रातील प्रत्येक पिढी शिव विचारातून प्रेरणा घेते. गडकोटांचे संगोपन आणि संवर्धनाविषयी जनजागृती, पर्यटनाला पोषक अशी वातावरण निर्मिती आणि त्यातून बेरोजगार तरुणांना रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी यंदाच्या शिवजयंतीला शिवोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, ``पर्यटन वाढविण्यासाठी गट कोटांचे संगोपन आणि संवर्धनाचा आराखडा तयार करणे , मूलभूत आणि पायाभूत सुविधांसाठी फाऊंडेशन, लोकवर्गणी आणि शासन स्तरावर पाठपुरावा घेऊन उपक्रमाला चालना देणे, पर्यटक आणि अभ्यागतांसाठी माहिती फलक लावणे, पारगड, गंधर्वगड, कलानंदीगड, महिपाळगड याठिकाणी कायमस्वरूपी भगवा ध्वज उभारणे अशा विविध उपक्रमांची सुरवात या शिवजयंतीच्या निमित्ताने सुरु करत आहोत. दिनांक १४ ते १७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पारगडावर केळुस्कर यांच्या शिवचरित्राच्या पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पारायणात सहभागी होणाऱ्या व्यक्तीला फाऊंडेशनच्या वतीने निवास, चहा, न्याहारी आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. यासाठीची नावनोंदणी दिनांक १० फेब्रुवारी २०१९ पर्यंत करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाचे प्रथमच आयोजन होत आहे. १९ फेब्रुवारी 2019 रोजी पारगड येथे शिवप्रतिमा पूजन, कायमस्वरूपी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण, भागातील तरुण - तरुणींची शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, या कार्यक्रमाने आणि गडावरील मानकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवाला लोकचळवळीचे स्वरूप द्यायचे आहे. त्यामुळे समाजातील सर्व आबालवृद्धांनी उत्सवात या उत्सवात सहभागी होण्यासाठी युवराज जाधव यांच्याशी ९९८७४६१२८२ व ८३७८८२०६९२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे वाहन फाउंडेशनच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment