प्रशासनासोर साथींच्या रोगांचे आव्हान
कोनेवाडी (ता. चंदगड) येथे घरांची पडझडीने अनेकांचे संसार उध्वस्थ झाले आहेत. |
चंदगड / प्रतिनिधी
महापुरामुळे चंदगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तालुक्यात महापुराने थैमान घातल्याने अनेकांचे संसार उध्वस्थ झाले आहेत. महापुराचे पाणी घरामध्ये शिरल्याने घरे पडून अनेक लोकांना स्थलांतर करावे लागले. पुरामुळे शेती जमीनदोस्त झाली असून वाफेच्या वाफे वाहून गेल्याने जागा शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिकांसोबत शेतकरीही उध्वस्थ झाला आहे. कोवाड येथील बाजारपेठ आजही पाणीखालीच आहे. उद्या सायंकाळपर्यंत कोवाड बाजारपेठेतील पाणी उतरण्याची शक्यता आहे.
कोनेवाडी या गावाचा पंधरा दिवसापासून संपर्क तुटला आहे. या गावात अतिवृष्टीमुळे नारायण गावडे, चाळोबा गावडे, तुकाराम गावडे, नरसू गावडे, तुकाराम गावडे, बारकु गावडे, जानकू गावडे, नारायण गावडे, संतोष गावडे, सट्टू गावडे, अर्जून धुमाळे, वैजनाथ गावडे यांच्यासह 15 घरांची पडझड होवून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. या गावातील लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी घरे पडलेल्या नागरीकांना त्यांच्या जनावारांसह अन्य ठिकाणी हलविले व त्यांची सोय केली. वैद्यकीय सेवा वगळता अद्यापही काय गावाला तातडीची सरकारी मदत मिळालेली नाही.
चार मार्ग सुरु, अन्य मात्र अद्यापही बंदच..............
आठ-दहा दिवसानंतर आज चंदगड तालुक्यातील चंदगड-बेळगाव, चंदगड-हेरे व चंदगड-गवसे, चंदगड-माणगाव हे चार मार्ग आज वाहतुकीला खुले आहे. त्यामुळे लोक जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी आज बाहेर पडले. मात्र आजही कोनेवाडी, हल्लारवाडी, करंजगाव हे तीनही बंधारे पाण्याखालीच आहेत.
प्राथमिक आरोग्याच्या सुविधा.............
चंदगड तालुक्यातील पावसाने काहीशी उसंत दिल्यानंतर सरकारी पातळीवर आरोग्य विभागाच्या वतीने पुरग्रस्थ भागात साथींच्या रोगांचा प्रसार होवू नये. यासाठी प्राथमिक आरोग्याच्या सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्याचबरोबर नागरीकांना स्वच्छतेबाबत सुचनाही देण्यात आल्या. तरीही अनेक गावात हि यंत्रणा न पोहोचल्याने साथींच्या रोगांचा धोका आजही कायम आहे.
कधीही भरुन न येणारे शेतीचे लाखोंचे नुकसान.............
तालुक्यात प्रामुख्याने भात, नाचणा, भुईमूग, ऊस, मका हि पिके घेतली जातात. गेले आठ दिवस महापुराच्या पाण्याच्या खाली पिके राहिल्याने पिके कूजून गेली आहे. तसेच पुराच्या पाण्याचा प्रवाहामुळे अनेक ठिकाणीच शेतीच वाहून गेली आहे. उंचावरील पिके वगळता सखल भागातील पिकांचे शंभर ट्कके नुकसान झाले आहे. नदीकाठची शेतीच काही ठिकाणी वाहून गेल्याने हे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रु ओघळत आहेत. एकीकडे घर कोसळले तर दुसरीकडे शेतीचे नुकसान, त्याचसोबत जनावारांचा चाराही बाद झाला आहे. त्यामुळे शेतकरी सद्या तिहेरी संकटात सापडला आहे. सरकारने तातडीने मदत म्हणून शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तु देणे आवश्यक आहे. पुरामुळे दुध संकलन बंद असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
खंडीत विजपुरवठा, मोबाईल सेवाही ठप्प, एसटीचेही नुकसान, त्यामुळे संपर्क तुटलेलाच.
पुराच्या काळात सुसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष विजेच्या खांबावर पडून विजपुरवठा खंडीत झाला होता. काही ठिकाणी ट्रान्सफार्मर पाण्यात असल्याने व काही घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने वीजपुरवठा खंडीत केला होता. अजूनही काही ठिकाणी विजेची खांब पाण्यात असल्याने आज पंधरा दिवस उलटूनही काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. विज पुरवठा खंडीत झाल्याने याचा परिणाम मोबाईल सेवेवरही झाला आहे. बी. एस. एन. एल. वगळता पुरास्थितीमध्ये अन्य कोणत्याही कंपनीची खासगी मोबाईल सेवा सुरु नव्हती. विज नसल्याने मोबाईल चार्ज करता न आल्याने गेले पंधरा दिवस संपर्क हा तुटलेलाच होता. त्यामुळे पाण्याची काय परिस्थिती आहे. कोठे-काय सुरु आहे. याची माहीती नागरीकांना न मिळाल्याने संपर्क तुटला. या कारणामुळे लोक भितीच्या छायेखाली होते. अतिवृष्टीमुळे एसटी सेवाही ठप्प होती. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना सक्ती सुट्टी घ्यावी लागली. पुराच्या पूर्वी मुक्कामी बाहेरगावी गेलेल्या गाड्या दुसऱ्या दिवशी तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने चालक व वाहकासह बसेसही तेथेच अडकून होत्या.
चार दिवसानंतर घरी परतले ग्रामस्थ..................
फाटकवाडी (ता. चंदगड) येथील घटप्रभा मध्यम प्रकल्पाची सांडव्याच्या खालील बाजूची भिंत खचून डोंगराकडील बाजूची माती घसरत आहे. त्यामुळे भविष्यात अधिक धोका होवू नये, यासाठी घटप्रभा नदीकाठ क्षेत्रातील 20 गावातील लोकांना स्थलांतराचा इशारा प्रशासनाच्या वतीने दिला आहे. त्यापैकी नदीकाठावरील फाटकवाडी, हिंडगाव व इनाम सावर्डे या गावातील नागरीकांना चंदगड येथे सुरक्षेच्या कारणास्तव हलविण्यात आले होते. गेले चार दिवस विविध सामाजिक संस्था, तरुण मंडळे, मुस्लीम समाजाचे युवक व दानशुर व्यक्ती यांच्या मदतीने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. गेले तीन दिवस प्रकल्प परिसरातील व तालुक्यातील पाऊस कमी झाल्याने या तीनही गावांतील लोकांना प्रशासनाच्या वतीने गावी परत पाठविण्यात आले.
कोवाड बाजारपेठेचे कोट्यावधीचे नुकसान...............
कोवाड बाजारपेठ नदीजवळ आहे. गेले अनेक वर्षे ही बाजारपेठ दिमाखात सुरु होती. मात्र यावर्षी पावसाने थैमान घाल्याने कोवाड बाजारपेठेत रात्रीच्या वेळी अचानक पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांना साहित्य बाहेर काढण्याचीही संधी मिळाली होती. औधष दुकाने, कापड दुकाने, फर्निचर, फोटो स्टुडिओ, किराणा, शॉपींग सेंटर, भांडी स्टोअर्स, स्विट मार्ट, कृषी सेवा केंद्र यासह अनेक दुकाने अचानक पाण्याखाली गेल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेकांनी बँकेतून कर्ज तर काहीनी हातउसने घेवून दुकाने उभी केली होती. जे छोटे-मोठे दुकानदार आहेत. त्यांचे सर्वस्व उध्वस्थ झाले आहे. सर्व कुटुंब दुकानावर अवलंबून होते, हे दुकानच पुरात बुडाल्याने आता जगायचे तरी कसा असा प्रश्न दुकानादारांच्यासमोर उभा ठाकला आहे. दुकानासाठी बँकेचे अगोदर काढलेले पैसे भरायचे? की नवीन दुकान कसे उभे उभारायचे हा यक्ष प्रश्न दुकानादारांच्यासमोर आहे. पुरग्रस्त कुटुंबासोबत व्यापारी वर्गालाही पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी मोठ्या मदतीची गरज आहे.
विविध स्तरातून मदतीचा ओघ..................
चंदगड तालुक्यातीत गेल्या 35 वर्षातील हा सर्वांत मोठा पुर होता. एवढी भीषण परिस्थिती निर्माण होईल याची कोणीही कल्पना केली नव्हती. त्यामुळे गाफील होते. पण पावसाचा जोर वाढून भीषण पुरस्थिती निर्माण झाल्याने ऐनवेळी लोकांना घरातून बाहेर पडता आले नाही. तसेच व्यावसायिकांनाही दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविता न आल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराची भिषणता पाहून अनेकांनी आपापल्या परीने वस्तु स्वरुपात मदत देण्यासाठी हजारो हात सरसावले आहेत. मात्र सरकारकडून अद्यापही तातडीची म्हणावी तशी मदत पुरग्रस्तांना मिळत नसल्याची खंत आहे.
No comments:
Post a Comment