![]() |
कोवाड (ता. चंदगड) येथे राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटी इंडियाच्या टीमने पुरात अडकलेल्या 24 जणांची बोटाच्या सहाय्याने सुटका केली. त्यांना बोटीत बसवून पाण्यातून बाहेर काढताना. |
संजय पाटील / कोवाड
धो-धो पडणारा पाऊस, धरणातील पाण्याचा विसर्ग, काळजाचा ठेका चुकवीणारे वाढणारे पुराचे पाणी अशा सर्व परिस्थितीतुन कोवाड (ता. चंदगड) मधील नदीपलीकडे पुरामध्ये अड़कलेल्या 24 जणांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटी इंडिया यांनी हे यंत्रणा राबवली.
गेले चार दिवस चंदगड तालुक्यात धुवाँधार पाऊस सुरु असल्याने पुरस्थिती निर्माण झाली होती. कोवाडमध्ये तळमजल्यासह पहिला मजलाही पाण्याखाली गेला होता. दुकानांच्यावर वास्तव करणाऱ्या अनेक कुटुंबांना गडहिंग्लज येथील रेस्क्यु टीमने बाहेर काढले होते. मात्र काही लोक अजूनही तिसऱ्या मजल्यावर होते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे या लोकांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते.
मंगळवारी सायंकाळपासून त्यांना काढण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र ते असफल ठरले. तिसऱ्या मजल्यावरील लोक जीव मुठीत घेवून मदतीची वाट पहात होती. या घटनेची माहीती आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी बुधवारी सकाळी मिळाळ्यानंतर त्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जलसंपदामंत्री गिरीषजी महाजन यांची भेट घेवुन कोवाड मधील परिस्थितीची कल्पना दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना देखील हेलिकॉप्टर रेस्क्यु साठी विनंती केली होती. डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी आपल्या पातळीवर प्रयत्न चालु ठेवत त्यांचे नातेवाईक असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याशी संपर्क साधला. बेळगाव येथील मराठा रेजिमेंट सेंटर मधुन हेलिकॉप्टर रेस्क्यु साठी मागणी केली. ब्रिगेडियर श्री. गोविंद यांनी ती मागणी मान्य केली. पण दुर्दैवाने अतिवृष्टी होत असल्याने तांत्रिक अडचण झाल्याने हेलिकॉप्टर कोवाड पर्यंत पोहचू शकले नाही. कोणत्याही परिस्थितीत या लोकांना वाचविण्यासाठी डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले. मेजर अभिनव राय, मराठा लाईट इनफ्रंट्री सेटर यांनी डॉ. बाभुळकर यांच्याशी चर्चा करून त्यांच्या विनंतीवरून बोटीने बचावकार्याचा प्रयत्न करण्याचे मान्य केले. बेळगाव येथून रेस्क्यु टीम बेळगावहून कोवाडला येणार होती. मात्र पुराचे पाणी दुरवर पसरल्याने कोवाडपर्यंत येणे शक्य नव्हते. त्यामुळे स्थानिक लोकांच्याकडून माहीती घेवून बेळगावमधून कागणीमार्गे टीम कोवाडच्या नदीपलिकडे दाखल झाली. येथील परिस्थिती भिषण होती.
पाण्याचा प्रवाह क्षणाक्षणाला वाढत होता. तसतसा पुरात अडकलेल्या लोकांच्या काळजाचा ठेका चुकत होता. राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटी इंडियाच्या टीमने दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी बोटीने दोन-दोन लोकांना बाराहून अधिक वेळा पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. पुराच्या पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. बोट आपल्याकडे येत असल्याचे पाहून बिल्डींगमध्ये अडकलेल्या लोकांना हायसे वाटले. एका बिल्डींगमध्ये एकाच कुटुंबातील चार, दुसऱ्या कुटुंबातील दोन, एका बिल्डींगमध्ये केवळ एक व्यक्ती अडकलेली होती. हे 24 लोक वेगवेगळ्या इमारतीमध्ये अडकून पडले होते. त्यामुळे बचावकार्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटी इंडियाच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून या नागरीकांना वाचविले. पाण्यातून बाहेर आल्यानंतर पुरात तीन दिवस अडकलेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही जणांनी आम्ही आशा सोडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटी इंडियाचे जवान त्यांच्यासाठी देवदुत म्हणूनच आले होते. सबलेफ्टनंट आदित्य सिंह (आय. एन. एस. विक्रमादित्य) व त्यांच्या सहकार्यांनी कोवाड येथे अडकलेल्या 24 नागरिकांची शर्थीचे प्रयत्न करत सुटका केली. यामध्ये स्थानिक वैजनाथ पाटील, अमोल कोकीतकर यांनीही बचावकार्यात मदत केली. त्यामध्ये सौ. गायत्री दिग्विजय पाटील या एका गर्भवती महिलेचा समावेश होता. तसेच वयोवृद्ध दांपत्यही होते. या मिशनमध्ये राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटी इंडिया (RLSSI)चे प्रफुल्ल पांडे व कौस्तुभ बक्षी यांनी ही सर्व यंत्रणा राबविली. त्याचबरोबर प्रांताधिकारी विजया पांगारकर या वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती हाताळली.
![]() |
संजय पाटील, कोवाड |
No comments:
Post a Comment