कोवाड बाजारपेठ पाण्याखालीच, अनेक कुटुंबांचे स्थलांतर, पुरात अडकलेल्या बाराजणांना वाचविण्यासाठी धडपड - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2019

कोवाड बाजारपेठ पाण्याखालीच, अनेक कुटुंबांचे स्थलांतर, पुरात अडकलेल्या बाराजणांना वाचविण्यासाठी धडपड

पुरामुळे हाहाकार, अनेक मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला, वीज खंडीत, मोबाईल सेवा ठप्प.

पुरामुळे कोवाड गावाला बेटाचे स्वरुप प्राप्त झाले होते. 
चंदगड \ प्रतिनिधी
तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे. चंदगड-गडहिंग्लज, चंदगड-बेळगाव, चंदगड-कानूर हे मार्ग बंद झाल्याने अनेक लोक अडकून पडले आहेत. चंदगड शहराच्या कॉलेज रोडवर काल पुराचे पाणी आले होते. आज या पुराच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांच्यामध्ये भितीचे वातावरण आहे. गेल्या 35 वर्षातील सर्वात मोठा पुर असल्याचे बोलले जात आहे. याच पुराच्या पाण्यातून लोक वाट काढत जीव धोक्यात घालून ये-जा करत आहेत. 
बेळगाव-वेगुर्ला राज्यमार्गावरील दाटे गावच्या रस्त्यावरील घरे पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहेत.
वातावरणात गारवा असल्यामुळे चंदगड येथील सरकारी रुग्णांलयात रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र येथे उपचार घेणे शक्य नसलेल्या रुग्णांना गडहिंग्लज व बेळगाव येथे पाठविण्यात येते. मात्र सर्वत्र पुरस्थिती असल्याने नाईलाजाने सरकारी रुग्णांलयात उपचार घेतले जात आहेत. आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सरकारी रुग्णांलयातील वैद्यकीय अधिकारी व चंदगडमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना दिवसभर कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणतीही तातडीचे गरज असल्यास आमदारांनी कळविण्याचे आदेश दिले आहेत. 
चंदगडच्या काॅलेज रोडवर दुसऱ्या दिवशीही पाण्याची पातळी वाढतच होती. 
चंदगड ग्रामीण रुग्णांलयातील स्त्री-रोग तज्ञ डॉ. एस. एस. साने कोल्हापूर येथे पुरामुळे अडकल्याने चंदगड ग्रामीण रुग्णांलयात भुलतज्ञ नसल्यामुळे सिझर प्रसुतीसाठी आलेल्या महिलांचे हाल होत आहेत. घटप्रभा, झांबरे यासह अन्य प्रकल्प भरल्यामुळे या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी सोडले जात असल्यामुळे पाणी ओसरण्याऐवजी दिवसागणिक वाढत आहे. 
चंदगडच्या शिवाराला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. 
वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून विद्युत पोलवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेल्याने विद्युत पुरवठा बंद केला आहे. पुर असल्यामुळे कर्मचाऱ्यानाही काम करताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे गेले तीन दिवस चंदगड शहर तर तालुक्यातील अनेक गावे गेले आठवडाभर अंधारात आहेत. विज नसल्याचा परिणाम मोबाईल सेवेवर झाल्याने मोबाईल व इंटरनेट सेवाही ठप्प झाली आहे. दाटे गावात पाणी शिरल्याने बेळगाव-वेगुर्ला राज्यमार्गावरील घरे निम्याहून अधिक पाण्याखाली गेली आहेत. शेत-शिवारांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. 
कोवाड येथे रेस्क्यु टीम पुरात अडकलेल्या लोकांचा शोध घेताना. 
कोवाड बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने कोवाड गाव अर्धे पाण्यात बुडाले आहे. खाली दुकाने व वरच्या मजल्यावर रहायला असलेल्या अनेक व्यापारी पाण्यात अडकले होते. मात्र कालपर्यंत रेस्क्यु टीमने व स्थानिक नागरीकांनी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वाचविले. या स्थलांतरीत केलेल्या नागरीकांना आरोग्य केंद्र, स्थानिक नातेवाईक व प्राथमिक शाळेत हलविण्यात आले आहे. 
चंदगडच्या शिवारात असलेल्या घरामध्ये पाणी शिरल्याने तळमजला पाण्याखाली गेला आहे. 
कोवाड येथे तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या नागरीकांना सोडविण्यासाठी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी कोवाड येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरीकांना वाचविण्यासाठी रेस्क्यु टीम पाठविण्याचे नियोजन केले होते. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे तेथे रेस्क्यु टीम पोहोचविणे शक्य नाही. त्यामुळे या लोकांना बाहेर काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी बोलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हेलीकॉप्टरची मागणी केली आहे. मात्र धो-धो पाऊस पडत असल्यामुळे हेलीकॉप्टर उतरविण्याला अडचणी येत आहेत. हेलीकॅप्टर टेकऑफ करण्यासाठी वातावरण क्लिअर नसल्याने सद्यातरी पुरात अडकलेल्या नागरीकांना वाट पहावी लागत आहे. मात्र क्षणाक्षणाला पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने पुरामध्ये अकडलेल्या नागरीकांच्या काळजाचा ठेका चुकत आहे. 
कोवाड गावात पुराच्या पाण्यातून आलेला कचरा घरामध्ये शिरत आहे.
चंदगड तालुक्यातील पुरस्थिती पाहता कर्नाटकातील हिडकल व आलमट्टी डॅममधील विसर्ग वाढविण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पाणी सोडण्याची विनंती केली आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील पुराचे पाणी कमी होण्यास मदत होईल असे डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी सांगितले. 

आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात सरासरी 158.66 तर आतापर्यंत 2108.33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यात 45 घरांची पडझड होवून 10 लाख 96 हजार रुपयांचे तर एक पोल्टीचे पत्र उडून भिंती पडून दोन लाखाचे तर एका शाळेचे कमाऊंड पडून सुमारे तीन हजार रुपयांचे असे एकूण 13 लाख 26 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वांधिक पाऊस हेरे मंडलमध्ये 190 मिलीमीटर तर माणगाव मंडलमध्ये सर्वात कमी 110 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 


No comments:

Post a Comment