निट्टूरचा नरसोबा डोंगर खचतोय, ग्रामस्थामध्ये घबराट - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2019

निट्टूरचा नरसोबा डोंगर खचतोय, ग्रामस्थामध्ये घबराट

निट्टूर (ता. चंदगड) येथे खचलेला नरसोबा डोंगर. (छाया - संजय पाटील)
तेऊरवाडी  / प्रतिनिधी 
कोवाड पासून केवळ दोन किमी अंतरावर असणाऱ्या निट्टूर (ता. चंदगड) येथील नरसोबा देवालय डोंगर गावच्या दिशेने खाली खचत असल्याने ग्रामस्थामध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. निट्टूरची वाटचाल माळीणच्याच दिशेने होण्याचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने व भूगर्भ तज्ञांनी याची सखोल तपासणी करून त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे.
चंदगड तालूक्याच्या पुर्व भागात निट्टूर या ठिकाणी नरसोबा डोंगर हे पर्यटन स्थळ आहे . गावचे ग्रामदैवत तर परिसरातील कोवाड, तेऊरवाडी , मलतवाडी , घुल्लेवाडी , म्हाळेवाडी आदि गावातील भाविक मोठ्या संख्येने नरसोबा डोंगरावर असणाऱ्या प्राचिन पांडवकालीन मंदिराला भेट देतात . अतिऊंच असणाऱ्या या नरसोबा देवालयावरून बहूतांश चंदगड तालूक्याचे दर्शन होते . अत्यंत निसर्गरम्य व विलोभनिय असणाऱ्या या नरसोबा डोंगराचे अस्तीत्व आता धोक्यात आले आहे . याला कारणीभूत निट्टूरचे ग्रामस्थच आहेत . या डोंगराच्या पायथ्याजवळ घरे बांधण्यासाठी मोठया प्रमाणात उत्खनन करण्यात येत आहे . त्यामूळे या डोंगराचा पाया ठिसूळ बनत चालला आहेे . डोंगर पायथ्यालाच उत्खनन करून मोठ्या प्रमाणात घरांचे बांधकाम चालू आहे . घुल्लेवाडी रोडलगत गर्ल हायस्कूलचा परिसर असाच उत्खनन करुन बांधण्यात आला आहे . त्याचबरोबर निट्टूर  वरून मध्यवर्ती तेऊरवाडीकडे जाणाऱ्या चांगोजी गावडे घरापर्यंत अनेक ग्रामस्थांनी डोंगर पायथा उत्खनन करूनच घरांचे बांधकाम केले आहे .पायथाच बाजूला काढल्याने वरचा डोंगर खालच्या बाजूने घसरत चालला आहे. या महिण्यात झालेल्या अतिवृष्टीने विठ्ठल पाटील यांच्या घरामागे प्रचंड आकाराचा डोंगराचा भूभाग झाडासाहित घसरून खाली आला. घराला लागूनच डोंगर घसरल्याने पाठीमागील दरवाजे बंद झाले . डोंगरावर तर दोन फूट रुंद, पाच फूट खोल तर जवळपास शंभर मिटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत. या भेगा हळूहळू मोठ्या होत असून  हा भूभाग पण खाली घसरून येण्याचा धोका आहे. असे दुर्देवाने झाल्यास माळीण सारख्या प्रसंगाला येथील ग्रामस्थाना सामोरे जावे लागणार आहे. असे घडू नये यासाठी प्रशासनाने येथील उत्खननावर पर्णतः बंदी घालणे गरजेचे आहे .तसेच ग्रामपंचायतीनेही डोंगर पायथ्याला घर बांधकाम परवानगी नाकारने महत्वाचे आहे. प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा एकदा माळीणची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment