चंदगड नगरपंचायतीचे दुसऱ्यांदा वाजले बिगुल, 29 ला मतदान, 30 डिसेंबरला मतमोजणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2019

चंदगड नगरपंचायतीचे दुसऱ्यांदा वाजले बिगुल, 29 ला मतदान, 30 डिसेंबरला मतमोजणी

चंदगड नगरपंचायत इमारत.
चंदगड / प्रतिनिधी
बहुचर्चित चंदगड नगरपंचायतीची निवडणुक आज दुसऱ्यांदा जाहीर झाली. पहिल्या नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी 29 डिसेंबर 2019 रोजी मतदान तर 30 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणुक आयोगाने आज जाहीर केले. 
चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने पहिल्या नगरपंचायतीची नगराध्यक्षा होण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी होणार आहे. नगराध्यक्ष पद खुल्या महिलेसाठी राखीव असल्याने स्थानिक दिग्गज नेत्यांनी आपल्या सौ. ना निवडणुक रिंगणात उतरविण्याची तयारी यापूर्वीच केली आहे. 
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळविण्यासाठी चंदगडकरांना मोठा संघर्ष करावा लागला. यासाठी पाच वेळा निवडणुकीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला. आंदोलने केली, साखळी उपोषण करुन लोकांच्यातून जनजागृती केली. त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी सामुहिक राजीनामे दिले. चंदगडकरांनी नगरपंचायतीच्या मागणीसाठी आपला संघर्ष सुरुच ठेवल्याने अखेर २ जानेवारी २०१९ रोजी चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. राजकीय पक्षांच्या दृष्टीनेही नगरपंचायतीची निवडणूक ही महत्त्वाची ठरणार असल्याने नगरपंचायतीवर आपलेच वर्चस्व रहावे, यासाठी प्रयत्न होणार आहेत. यापूर्वी चंदगड ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे भरमू पाटील गटाची सत्ता होती. माजी मंत्री श्री. पाटील भाजपमध्ये गेल्याने चंदगडमधील भाजपची ताकद वाढली आहे. चंदगड शहरामध्ये सद्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभीमानी हे पक्ष कार्यरत आहेत. त्यामुळे येथे बहुरंगी लढतीचे चत्र सद्या तरी दिसत आहे. पहिल्या नगरपंचायतीची नगराध्यक्षा व नगरसेवक होण्यासाठी अनेकांनी आरक्षण जाहीर झाल्यापासूनच प्रचार सुरु केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बरीच खलबत्ते होवून अखेर दोन दिवसापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. त्यामुळे या निवडणुकीतही याचा काहीसा परिणाम पहायला मिळणार आहे. 
यापूर्वी पहिल्यांदा चंदगड नगरपंचायतीची निवडणुक 30 जुलै 2019 रोजी जाहीर झाली होती. ३ सप्टेबर मतमोजणी होणार होती. या दरम्यान कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात महापुर आल्याने या कालावधीत अनेक लोक संकटात होते. या कालावधीत वीज व इंटरनेट सेवाही खंडीत झाली होती. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणे शक्यत नव्हते. त्यामुळे चंदगड शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून चंदगड तालुक्यात महापुर आल्याने आम्हाला अर्ज भरता आले नसल्याचे कारण दाखवून हि निवडणुक रद्द करुन पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापुराची परिस्थिती लक्षात घेता निवडणुक आयोगाने 16 आगस्ट 2019 रोजी नगरपंचायतीची निवडणुक शहरवाशीयांच्या अपेक्षेप्रमाणे रद्द केला. त्यानंतर काही कालावधीत विधानसभा निवडणुक लागल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आज चंदगड नगरपंचायतीची निवडणुक जाहीर झाल्याने सर्वच राजकीय मंडळी पुन्हा जोमाने कामाला लागली आहेत. 

                                                   नगरपंचायत कार्यक्रम पुढीलप्रमाणे
नामनिर्देशनपत्रे बुधवारी 4 डिसेंबर 2019 रोजी सकाळी अकरा ते गुरुवारी 12 डिंसेबर 2019 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत या कालावधीत संकेतस्थळावर भरुन दाखल करावा. 8 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 13 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 18 डिसेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 29 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 30 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.

                                             प्रभागानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र. १, २, ५, ६, १२, १४ या प्रभागासाठी सर्वसाधारण (खुला), प्रभाग क्र. ३, १०, १७ यासाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ४, ९, १३, १५, १६ – सर्वसधारण (महिला) व प्रभाग क्र. ८, ११ – नागरीकांचा मागास प्रवर्ग. 

No comments:

Post a Comment