करेकुंडी येथे पकडला खतरनाक घोणस...! संदीप टक्केकर यांनी वर्षभरात १०० हून अधिक सापांना केले रेस्क्यू - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2025

करेकुंडी येथे पकडला खतरनाक घोणस...! संदीप टक्केकर यांनी वर्षभरात १०० हून अधिक सापांना केले रेस्क्यू

 

संग्रहित छायाचित्र

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

      चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी सर्प शाळेचे सर्पमित्र संदीप बाबुराव टक्केकर यांनी काल करेकुंडी येथे लाकडांच्या ढिगार्‍याखाली लपलेला खतरनाक घोणस साप पकडून त्याला  रेस्क्यू केले. 

    करेकुंडी येथील अमित प्रभाकर सुतार यांच्या शेतातील लाकडांच्या ढिगार्‍याखाली विषारी घोणस साप असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ सर्पमित्र संदीप टक्केकर यांना फोनवरून ही माहिती दिली. काही वेळातच येऊन त्यांनी या जहाल विषारी घोणस जातीच्या सापाला पकडले व नैसर्गिक जंगल अधिवासात त्याला सोडून दिले. 

      आज ३१ डिसेंबर २०२५ वर्षातील शेवटचा दिवस गेल्या वर्षभरात त्यांनी तालुक्यातील मनुष्य वस्तीत शिरलेल्या तस्कर, वेरूळा, कवड्या, नाणेटी, धामण आदी बिनविषारी सापां बरोबरच नाग, घोणस, मण्यार, फुरसे आशा १०० हून अधिक सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. साप हा पर्यावरण नैसर्गिक साखळी मधील सर्वोच्च स्थानी असलेला प्राणी असून तो शेतकऱ्याचा मित्र आहे. त्याचे संवर्धन झाले पाहिजे या हेतूने सन १९६६ मध्ये आद्य सर्पमित्र बाबुराव टक्केकर यांनी ढोलगरवाडी येथे सुरू केलेल्या सर्प शाळेची परंपरा त्यांचे चिरंजीव संदीप टक्केकर व येथील सर्प शाळेशी संलग्न असलेल्या मामासाहेब लाड विद्यालयातून सापांना हाताळण्याची शास्त्रोक्त माहिती घेऊन बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी जगभरात सर्पमित्र म्हणून काम करत आहेत. अशा सर्पमित्रांमुळेच सापांच्या अनेक जाती पर्यावरणात तग धरून आहेत.

No comments:

Post a Comment