गोकुळ दुध संघात चंदगड, आजरा, गडहिंग्लजला दोन-दोन संचालक पदे द्या - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2020

गोकुळ दुध संघात चंदगड, आजरा, गडहिंग्लजला दोन-दोन संचालक पदे द्या - आमदार राजेश पाटील


कुदनुर (ता. चंदगड) येथे हनुमान दूध संस्था रौप्य महोत्सव सांगता समारंभात बोलताना आमदार राजेश पाटील, सोबत गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे, संचालक दीपक पाटील, डी. व्ही. घाणेकर, नामदेव नार्वेकर आदी मान्यवर.
कालकुंद्री / प्रतिनिधी 
गोकुळचा ब्रँडनेम म्हैस दुधावर चालतो व चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तीन तालुक्यातून गेलेल्या दुधा पैकी 65 टक्के दूध म्हैशींचे असते. इतर तालुक्यातून म्हैस दूध कमी व गाय दूध जास्त ही स्थिती आहे. गोकुळ दुध संघ ब्रँडनेम साठी आमचे दूध, आमचे फॅट, आमचा एसएनएफचा वापरते. मात्र संचालक संख्या मात्र आम्हाला कमी हा अन्याय आहे. त्यामुळे यापुढे या तिन्ही तालुक्यांना जिल्हा दूध संघ गोकुळमध्ये दोन-दोन संचालक पदे मिळाली पाहिजे. अशी मागणी चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केली. कुदनुर (ता. चंदगड) येथील हनुमान महिला सह दुध संस्थेच्या रौप्य महोत्सव सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक बाळासो कोकीतकर होते.
पी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. दीपप्रज्वलन गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे, संचालक दीपक पाटील, कार्यकारी संचालक डीव्ही घाणेकर यांच्या हस्ते झाले. दूध संस्थेच्या चेअरमन विद्या मुतकेकर व सुमित्रा कुंभार यांनी स्वागत केले. राजेश पाटील पुढे म्हणाले, ``निवडणुका जवळ आल्यामुळे ठरावांची लगबग सुरू आहे. एका ठरावाला इतके लाख अशा गोष्टी कानावर येत आहेत. तर ठराव वाल्यांकडून आपल्या संबंधिताला संघात नोकरीच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. साडेतीन हजार ठरावापैकी तितक्या लोकांना नोकरी दिली तर गोकुळला महिनाभरात टाळे लागतील. याबाबत सर्वसामान्यांसाठी बिनकामाची बुलेट ट्रेन घेण्यापेक्षा गुजरात मधील आनंद दूध संस्थेचा आदर्श आपण घेऊ या असे सांगताना नरसिंगराव गट कुणाच्याही मागे फरफटत न जाता गोकुळ निवडणुकीत आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवेल असे स्पष्ट केले.``
गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे म्हणाले, ``एका गावात एकच संस्था गरजेची असताना लोकशाही मुळे गावोगावी पाच-सहा संस्था निर्माण झाल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. स्टाफ विभागल्याने डेअरीत काम करणाऱ्या कामगारांना पुरेसा पगार मिळत नाही.`` कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर म्हणाले, ``दुध व्यवसायाचे स्वरूप जागतिक झाले आहे. गतवर्षी संघाने साडेआठशे टन दूध पावडर आखाती देशात निर्यात केली. गोकुळ जागतिक दर्जाच्या संघांशी स्पर्धा करत असल्यामुळे आपली कॉलिटी टिकवण्यासाठी गावोगावच्या दूध संस्था आयएसओ मानांकनात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावर्षीपासून किमान पन्नास संस्था वर्षाला मानांकन धारक ठरतील असे नियोजन असल्याचे सांगितले.`` संचालक दीपक पाटील, सुखदेव शहापूरकर, गजेंद्र देशमुख, एम. बी. पाटील आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाला डॉ. अमर ऐतलवाड, सरपंच शालन कांबळे, नामदेव कोकितकर, विजया कोकितकर, डॉ. नामदेव कुट्रे, पुष्पमाला जाधव, उदयकुमार मोगले, बापुसो देसाई, श्वेता रामटेके, विष्णू आडाव, हरिभाऊ देवडे, तानाजी गडकरी, शंकर आंबेवाडकर, एस. एल. पाटील, एन. जे. सरनोबत, नामदेव लोहार आदींची उपस्थिती होती. लक्ष्मण कुंभार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment