चंदगड तालुक्यातील कोणत्या सजातील सहा गावच्या खातेदारांना मिळाले "हेरे सरजांम" मधील दुरूस्ती केलेले उतारे, उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांच्याकडून सातशे शेतकऱ्यांना वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

चंदगड तालुक्यातील कोणत्या सजातील सहा गावच्या खातेदारांना मिळाले "हेरे सरजांम" मधील दुरूस्ती केलेले उतारे, उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांच्याकडून सातशे शेतकऱ्यांना वाटप

नागनवाडी (ता. चंदगड) येथे खातेदार शेतकर्याना हेरे सरजांम वतनाखाली असलेल्या वर्ग२च्या जमीनी वर्ग १ अशी दुरूस्ती करून उतारे देताना उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर ,बाजूला अव्वल कारकून बाबूराव खोत.
नंदकुमार ढेरे / सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
         चंदगड तालुक्यातील "हेरे सरजांम वतनाच्या" अंमलाखाली असलेल्या   ४७ गावापैकी आज पहिल्यांदा नागनवाडी, दाटे, कुर्तनवाडी, गंधर्वगड, गुडेवाडी व वरगाव या सहा गावातील ७०० खातेदार शेतकऱ्यांना 
नागनवाडी (ता. चंदगड) येथील कार्यालयात उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर  यांच्या हस्ते हेरे सरजांम भोगवटादार वर्ग २ चे वर्ग १ केलेले सात बारा उताऱ्याचे आज वाटप करण्यात आले. त्यामुळे सात महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतलेल्या निर्णयाला चंदगड महसूलच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान यामुळेच आज खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप आले.
        हेरे सरजांम वतनाच्या"अंमलाखालील  जमिनी वर्ग २  करून त्या शासनाच्या वर्ग १ - क ऑनलाईन प्रणालीमध्ये खुल्या होऊन मिळाव्यात. यासाठी या ४७ गावातील शेतकऱ्यांनी अनेक अंदोलने व मंत्रालयस्तरापर्यत लढा उभा केला होता. मात्र गेली 25/30 वर्षे या लढ्याला यश आले नव्हते. अखेर जिल्हाधिकारी  दौलत देसाई यांनी नाताळ २०१९ च्या  पूर्वसंध्येला या जमिनीवर असलेल्या अटी शिथील केल्याने जवळपास पंधरा हजार शेतकरी कूटूंबाना या निर्णयाचा लाभ झाला.  तालुक्यातील ८० टक्के शेतजमिनी हेरे सरंजाम प्रकारच्या वर्ग २ इनामी स्वरूपाच्या असून त्यामधील अंदाजे ४७ गावे ही सरंजाम वतनाच्या जमिनी पूर्वीपासून सरकार नोंद कमी करून मालकी हक्काने दिलेल्या आहेत. शासनाने २००१ मध्ये उपयोगी करणासाठी खुल्या करून जमिनी मिळकती लोकांना मालकी हक्काने दिलेल्या आहेत. शासनाच्या दप्तरी वर्ग २ नमूद असल्याने सर्व जमिनी ऑनलाईन प्रणालीमध्ये ब्लॉक करून ठेवल्या आहेत. गट खुले करण्याची जबाबदारी जमाबंदी आयुक्त यांनी तहसीलदार यांना दिलेली असताना हेरे सरंजाम सिलिंग ॲक्ट जमिनी खुल्या करण्याची जबाबदारी आपल्यावर नसून ती उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांची असल्याचे कार्यालयातून सांगितले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ व्हायची. उर्वरित १० टक्के जमिनी या वर्ग १ खाली येतात. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाची फार मोठी अडचण झाली आहे. वर्ग २ गट खुला करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लोकांना तालुक्याच्या ठिकाणी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना सेवा सोसायट्या, पतसंस्था व इतर बँका यांचेकडून वर्ग - २ च्या अटीमुळे कर्ज पुरवठा बंद केल्यामुळे तालुक्यातील जनता सावकारी फाश्यात अडकली होती. आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता बँका, पतसंस्था, सेवासंस्था व इतर ठिकाणी जमिन तारण  कर्जे लवकर उपलब्ध  होणार आहे. दुरूस्त करून दिलेले उतारे वाटप करते वेळी अव्वल कारकून  बाबुराव खोत, मंडलाधिकारी  बाळासो देसाई, तलाठी सुधाकर देसाई, तलाठी राजश्री पचंडी, वैभव कोंडेकर, शिवदास वाघमारे, दिपक कांबळे, गणेश ठोसरे, चंद्रकांत पाटील तलाठी व खातेदार उपस्थित होते.
नंदकुमार ढेरे, चंदगड प्रतिनिधी

No comments:

Post a Comment