सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग:२६ (निमविषारी साप) मांजऱ्या / कॉमन कॅट स्नेक - चंदगड लाईव्ह न्युज

27 August 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग:२६ (निमविषारी साप) मांजऱ्या / कॉमन कॅट स्नेक

सी एल न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेल च्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २६ : (निमविषारी साप) मांजऱ्या /  कॉमन कॅट स्नेक
                                  मांजऱ्या साप /कॉमन कॅट स्नेक 
     मांजऱ्या साप /(Common Cat Snake)   शास्त्रीय नाव boiga Trigonata. मांजऱ्या    सापाचा समावेश कोल्युब्रिडी Colubridae सर्पकुळात होतो. साधा मांजऱ्या आणि फॉर्स्टन मांजऱ्या या दोन प्रजाती आहेत. हा साप निमविषारी असून दुर्मिळ प्रजातीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. याच्या मांजरासारख्या डोळ्यांवरून याला मांजऱ्या साप नाव पडले आहे.  या सापाची लांबी ६० ते १२५  सेंटीमीटर पर्यंत असते. याचा रंग फिकट राखाडी, हिरवट तपकिरी किंवा बदामी असून शरीरावर गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाची नागमोडी साखळी पद्धतीची नक्षी असते. डोक्यावर इंग्रजी Y अक्षरा सारखी खूण किंवा तपकिरी काळे ठिपके असतात. शरीर लांब सडपातळ व दोन्ही बाजूस चपटे, माने पेक्षा डोके बरेच मोठे असून इतर सापांच्या मानाने डोळे खूप मोठे व मांजरासारखे दिसतात. डोळ्यातील बाहुली उभी असते. हा साप बहुतांश झाडावर राहत असल्यामुळे याचे भक्ष्य पाली, सरडे, छोटे पक्षी व त्यांची पिल्ले, उंदीर हेच आहे. 
  काश्मीर सोडून भारतात सर्वत्र हा साप आढळतो. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत रांगा तसेच अमरावती मेळघाट पर्वतरांगांमध्ये अनेक वेळा आढळून आला आहे.  झाडेझुडपे, जंगल गवताळ व खडकाळ प्रदेशात याचे वास्तव्य असते. गावात व शहरी भागातही तो सापडला आहे. मांजऱ्या साप चपळ व सराईतपणे झाडांवर वावरतो.
 एप्रिल महिन्याच्या सुमारास याची मादी झाडांच्या ढोलीत चार ते आठ अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलांची लांबी २५ सेंटीमीटर पर्यंत असते. हा साप निशाचर असल्यामुळे आपले भक्ष रात्रीच्या वेळी शोधतो यावेळी तो जास्त सतर्क असतो. हा  निमविषारी असल्यामुळे माणसाला याचा धोका होत नाही. याला डिवचले असता शरीराचे नागमोडी वेटोळे करून हल्ला करतो. यावेळी शेपटीचा भाग उंच करून हलवतो.
  विषारी फुरसे व मांजऱ्या सापात बरेच साधर्म्य असल्यामुळे फुरसे समजून याची हत्या केली जाते पण हे चुकीचे आहे. दुर्मिळ होत चाललेल्या मांजऱ्या सापाला ओळखून याचे संरक्षण झाले पाहिजे. हा साप आढळल्यास त्वरीत सर्पमित्रांना पाचारण करावे.

माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर


शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२

No comments:

Post a Comment