जंगमहट्टी मध्यम प्रकल्प ओवरफ्लो, -चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाचा शेतीसह पिण्याचा पाणी प्रश्न निकालात - चंदगड लाईव्ह न्युज

06 August 2020

जंगमहट्टी मध्यम प्रकल्प ओवरफ्लो, -चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाचा शेतीसह पिण्याचा पाणी प्रश्न निकालात

जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील प्रकल्प अतिवृष्टीमुळे ओव्हर फ्लो झाला आहे. 
निवृत्ती हारकारे / कार्वे सी. एल. वृत्तसेवा
          चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेला जंगमहट्टी मध्यम प्रकल्प गुरु. दि. ६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ७ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यावरून पाणी होनहाळ नाल्यात पडत असल्याने प्रकल्प शंभर टक्के भरल्याचे जाहीर करण्यात आले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सकाळी संपलेल्या २४ तासांत विक्रमी २५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ८४ टक्के इतका भरलेला प्रकल्प गुरुवारी सकाळी १०० टक्के भरला आहे.
    चंदगड तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेला प्रकल्प आहे. हा प्रकल्प भरल्याने जंगमहट्टी सह माडवळे, तुर्केवाडी, मुरकुटेवाडी, मजरे कारवे, यशवंतनगर, मौजे कारवे, मांडेदुर्ग, गौळवाडी, ढोलगरवाडी या लाभक्षेत्रातील गावांचा शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. त्याचबरोबर किणी कर्यात भागातील बहुतांशी गावे या प्रकल्पावर अवलंबून आहेत. या सर्व गावांच्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे वर्षभर चालणार आहेत. जून-जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने समस्त शेतकरी व नागरिकांचे या प्रकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते. १.२२ टीएमसी इतकी क्षमता असलेल्या या प्रकल्पावर आधारित सर्व घटक सुखावले आहेत. ३४.६५ दशलक्ष घनमीटर एवढी या प्रकल्पाची क्षमता आहे. गेल्या वर्षी हा प्रकल्प ३१ जुलै २०१९ रोजी पूर्ण क्षमतेने भरला होता. या वर्षी सहा दिवस वेळाने प्रकल्प भरला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात आज अखेर १७२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांडव्यावरून पाणी होणहाळ नाल्याच्या नदीपात्रात जात असल्याने व मुळातच मुसळधार पावसाने होणहाळ नाल्यातील पाणी पात्राबाहेर असल्याने पावसाचे प्रमाण वाढल्यास गेल्यावर्षीप्रमाणे महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोवाड परिसरासह नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

                   कोरोनामुळे पर्यटकातून मात्र नाराजी...।
     जंगमहट्टी मध्यम प्रकल्प म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. धरणाच्या सांडव्यावरून पडणारे पांढरे शुभ्र पाणी व त्याच्या अवतीभोवती पसरलेला निसर्ग हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी येथे पर्यटकांची नेहमी गर्दी होत असते. या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याने येथे येणारे पर्यटक नाराज झाले आहेत. मात्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन न करता कोरोना महामारीतुन मुक्त होण्यासाठी प्रशासनास पर्यटक सहकार्य करताना दिसत आहेत.
निवृत्ती हारकारेNo comments:

Post a Comment