होसुर व किटवाड मधील दोन महिला कोल्हयाच्या हल्यात जखमी, चार महिन्यातील पाचवा हल्ला - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2020

होसुर व किटवाड मधील दोन महिला कोल्हयाच्या हल्यात जखमी, चार महिन्यातील पाचवा हल्ला

होसुर ता चंदगड येथील शिवारात कोल्ह्याच्या हल्ल्यात जखमी झालेली जिजाबाई पाटील
कोवाड / सी एल वृत्तसेवा (संजय पाटील)
          चंदगड तालुक्याला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचे अतिक्रमण सुरू आहे. यामुळे चंदगड तालुक्यात सातत्याने वन्य प्राणी व शेतकरी यांच्यात जीवघेणा संघर्ष सुरुच आहे. हत्ती, गवे, अस्वल, वाघ, कोल्हा यासह अन्य वन्यप्राण्यांचे हल्ले सुरूच आहेत. अशाच दोन घटना शनिवार दि 12 रोजी होसुर आणि किटवाड (ता. चंदगड) येथे घडल्या. कोल्ह्याच्या हल्ल्यात होसुर येथील जिजाबाई मारुती पाटील व किटवाड येथील  राजश्री सुनील इंचनाळकर ही माहेरवाशीण शेतकरी महिला जखमी झाल्या आहेत .
         गत चार महिन्यात हुंदळेवाडी पाठोपाठ होसुर आणि किटवाड येथील हा पाचवा हल्ला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. एकट्याने शेताकडे जाण्यासाठी शेतकरी वर्ग धजावत आहेत. शनिवारी सकाळी होसुर येथे पायरीचे काटे नावाच्या शिवारात उसामध्ये काम करत असताना त्यांच्यावर अचानक कोल्ह्याने हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या. त्यांच्या डाव्या हातावर कोल्ह्याने चावा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत असलेले त्यांचे पती मारुती पाटील  यांनी आरडाओरड केल्यानंतर कोल्हा पळून गेला. अशा परिस्थितीत ते नेसरी ता गडहिंग्लज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाल्या.त्यांनतर लगेच सायंकाळी 4  च्या सुमारास अशीच घटना किटवाड मध्ये सुध्या घडली,याठिकाणी  माहेरवाशीण असलेल्या कुऱ्याळ मधील राजश्री सुनील इचनाळकर यादेखील कोल्ह्याच्या हल्यात जखमी झाल्या आहेत.त्यांच्यावर देखील नेसरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.
वन विभागाने अशा वारंवार होणाऱ्या प्रकाराची तातडीने दखल घेऊन हल्यातील जखमींना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सर्व शेतकरी वर्गातून होत आहे. सदर गावाला लागुनच महिपाळगड हे वनक्षेत्र आहे. या ठिकाणाहून आलेल्या कोल्ह्याकडून सध्याचे हल्ले होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 


No comments:

Post a Comment