मुंबई येथे मंत्रालयात मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देताना आ.राजेश पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदार संघातील राजगोळी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी, पाटणे फाटा येथे ट्रामा केअर सेंटर तसेच गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे हॉस्पिटल,आजरा येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करा, अशी मागणी आ. राजेश पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे.
चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले असून पदनिर्मिती न झाल्याने हे रुग्णालय सुरु झालेले नाही. २ कोटी ७३ लाखांचा निधी याकरिता खर्ची पडला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या या केंद्रामध्ये तातडीने कर्मचारी द्यावे.गडहिंग्लजमध्ये सध्या १०० खाटांचे हॉस्पिटल कार्यरत असून, अर्ध्या जिल्ह्याचे रुग्ण या ठिकाणी येत असल्याने अतिरिक्त १०० खाट वाढवून हे रुग्णालय २०० खाटांचे करावे. रुग्णालयातील ३० रिक्त पदे तातडीने भरावीत. अत्याधुनिक मशिनरींची कमतरता असून ती तातडीने पूर्ण करावीत. त्याचबरोबर आजरा येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० खाटा उपलब्ध असून या ठिकाणी ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीमध्ये घेऊन अन्य सुविधा तातडीने पुरवाव्यात अशा मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मंत्री टोपे यांनी डोंगराळ भाग म्हणून प्रथम प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment