त्या, पर्यटकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2020

त्या, पर्यटकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

कार्तिक पल्याणी नंदेशा

कागणी : सी एल वृत्तसेवा

बेळगाव येथील रेल्वे खात्या चा कर्मचारी कार्तिक पल्याणी नंदेशा (वय २८, मूळ गाव बेलूर, चेन्नई) याचा किटवाड (ता. चंदगड) येथील लघुपाटबंधारे धरणाच्या सांडव्यातून तयार झालेल्या धबधब्या ठिकाणी रविवारी सायंकाळी ४.३० वाजता पाण्यात बुडून मृत्यू झाला. या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळला. यानंतर चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह चेन्नईहून चंदगड येथे आलेल्या त्या तरुणाच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.  याबाबत अधिक तपास कोवाड पोलिस चौकीचे एएसआय हनमंत नाईक करत आहेत.  रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने बेळगाव येथून वर्षा पर्यटनासाठी  किटवाड येथे सात तरुण आले होते. यापैकी नंदेशा हा तरुण एकटा मागे राहिला होता. बाकीचे सर्वजण धबधब्यापासून पुढे गेले होते. या दरम्यान या तरुणाचा पाय घसरून सांडव्यात कोसळला. दरम्यान परतीच्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातून बाहेर जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला. या मुळे तो वाहत जाऊन धबधब्यापासून पाचशे मीटर अंतरावर पुढे फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. सोमवारी सकाळी सदर तरुणाची आई, सासू-सासरे चंदगड येथे उपस्थित राहून मृतदेह ताब्यात घेतला. सदर ठिकाणचा पंचनामा हनुमंत नाईक, संतोष साबळे, अमर सायेकर, शिंदे यांनी केला. दरम्यान चंदगड येथील प्रशासनाकडून रेस्क्यू टीम ही पाचारण करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment