राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई, पार्ले येथे चार लाखांवर मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2020

राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई, पार्ले येथे चार लाखांवर मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी पार्ले येथे धाड टाकून पकडलेली गोवा बनावटीची दारू,सोबत वाहनासह संशयित आरोपी

चंदगड / तेऊरवाडी - सी. एल . वृत्तसेवा

         चंदगड तालुक्यातील पार्ले (ता. चंदगड) या ठिकाणी कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने गोव्याकडून येणाऱ्या वाहनांमध्ये बेकायदेशीर वाहतूक केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीचा चार लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा दारुसाठा व मुद्देमाल हस्तगत केला. यातील एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपी फरार आहेत.

         रविवारी  रात्री सव्वा एकच्या दरम्यान गोव्याकडून दोडामार्ग घाटातून तिलारी मार्गे एक वाहन गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असल्याची माहिती  राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाला  एका निनावी व्यक्तीकडून समजली. त्यानुसार भरारी पथकाने पार्ले या गावाजवळ रविवारी रात्री सापळा रचला होता. रात्री सुमारे सव्वा एकच्या दरम्यान एक टेम्पो येत असल्याचे आढळले. यावेळी भरारी पथकातील पोलीसांनी टेम्पो वाहन आडवले. टेम्पोमध्ये एक व्यक्ती बसली होती. 

        यावेळी वाहनांची  झडती घेतली असता  त्यामध्ये विविध ब्रँडचे गोवा बनावट दारूचे सुमारे 63 बॉक्स असल्याचे आढळून आले. त्यामुळे भरारी पथकाने  या वाहनाचा वाहनचालक दिवाकर लहू गवस (वय -39, रा. रा. साटेली भेडशी, घर नंबर 511, जळकोट वाडी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेतले.

         हा  दारू साठा पार्ले येथील रहिवाशी शिवाजी गावडे याला देण्यात येणार असल्याचे दारू वाहतूक करणाऱ्या दिवाकर गवस याने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी शिवाजी गावडे याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता तो सापडला नाही. छाप्यात हस्तगत केलेल्या विदेशी, गोवा बनावटीची ७५० व १८० मि.ली दारुच्या बाटल्याची किंमत ३,०९,६०० रुपये  तर वापरण्यात आलेले लहान मोबाईल संचची किंमत १,३३,००० रुपये असे मिळून एकूण ४,४२६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संशयितावर कारवाई केली.

         या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर चे निरीक्षक संभाजी बरगे, गडहिंग्लजचे निरिक्षक मिलिंद गरूड, दुय्यम निरिक्षक जगन्नाथ पाटील, अजय वाघमारे, किशोर धडे, जवान संदिप जानकर, सचिन कळेल, जय शिनगारे, राजेंद्र कोळी यानी भाग घेतला. अधिक तपास सहा. निरिक्षक जगन्नाथ पाटील करत आहेत.

चंदगड तालूक्यात वारंवार मोठया प्रमाणात गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त केला जात आहे. गोवा ते चंदगड पर्यंत येताना चेकपोष्ठ असूनही दारुची वाहतूक होण्यामागे पोलिस खात्यातील काहींचा यामध्ये सहभाग आहे का? अशी चर्चा तालुक्यात होत आहे.

No comments:

Post a Comment