सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २९ : ( विषारी साप) पट्टेरी पोवळा / Malaysian blue Coral snake - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2020

सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग : २९ : ( विषारी साप) पट्टेरी पोवळा / Malaysian blue Coral snake

सी. एल. न्यूज (चंदगड लाईव्ह न्युज) चॅनेलच्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग - २९ : (विषारी साप) पट्टेरी पोवळा/ Malaysian blue Coral snake
                  पट्टेरी पोवळा Malayan blue Coral snake 
      पोवळा सापाची माहिती आपण पाहिली आहे त्याच प्रजातीतील पट्टेरी पोवळा हा इलापिडी कुळातील विषारी साप आहे. याचे इंग्रजी नाव Malaysian blue Coral snake असून शास्त्रीय नाव Calliophis bivirgatus असे आहे. पूर्व भारतासह, मुख्यत्वे मलेशिया, ब्रह्मदेश (म्यानमार), इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड येथे सर्रास आढळतो. पूर्णतः जमिनीवर राहणारा हा साप असून समुद्रसपाटीपासून शंभर ते अकराशे मीटर उंचीपर्यंतच्या भागात याचे वास्तव्य असते. शरिराने बारीक व लांब असतो. काही प्रजातीतील पट्टेरी पोवळा पर्वतीय भागात दिड मीटर पर्यंत लांब असू शकतो. पण याची नियमित लांबी सरासरी अर्धा ते पाऊण मीटरपर्यंत असते. दिसायला सुंदर आकर्षक असतो. लाल-गुलाबी डोके व शेपटी कडील भागही त्याच रंगाचा असतो. शरीराचा रंग काळा, निळसर काळा असून अंगावर दोन्ही बाजूंनी माने पासून   शेपटीच्या लाल भागापर्यंत पांढरे किंवा निळसर पांढरे पट्टे/रेषा असतात. म्हणून याचे नाव पट्टेरी पोवळा असे आहे. हा जंगलामधील पानांच्या कचऱ्यात राहतो. डिवचले असता घाबरून पळून जातो. यावेळी आपली लाल शेपटी वर करतो. हा साप इतर मोठ्या सापांचे भक्ष्य बनतो.  आपल्यापेक्षा छोटे साप, सरडे, किटक हे याचे खाद्य आहे. हा दिनचर व निशाचरही आहे. पावसाळ्यात याची मादी तिन ते सहा अंडी घालते.
  आकाराने लहान असला तरी तो विषारी आहे. याच्या विषामुळे कधीकधी मानवी मृत्यू सुद्धा होतो. न्युरोटॉक्झीन Neurotoxin व सायटोटॉक्झीन cytotoxin  हे विषारी घटक याच्या विषामध्ये असतात. ते विष स्नायुंच्या ऊतींचा नाश व रक्तवाहिन्या ब्लॉक करतात. याच्या चाव्यामुळे शरिराचा दाह होणे,  रक्तदाब कमी होणे, अर्धांग वायू उद्भवणे अशी लक्षणे दिसतात. विंचू च्या विषाशी साधर्म्य असलेले हे विष आहे.

 टिप :-(पट्टेरी पोवळा सापासारखे काही साप आपल्याकडे आढळत नसले तरी चंदगड लाईव्ह न्युज चॅनेल (सी एन न्यूज चॅनल) चे वाचक हे संपूर्ण भारतासह जगातील विविध १५ पेक्षा अधिक देशांत विखुरले आहेत. अशा वाचकांना याचा उपयोग होईल या उद्देशाने काही सापांची माहिती दिली आहे. अनेक वाचकांनी परदेशातूनही सापांच्या मालिकेला लाईक केले आहे. तसेच इतर सर्व वाचकांनाही अशा सापांबद्दल अधिक माहिती होईल.)

पट्टेरी पोवळा प्रजाती मधील तसाच विषारी स्ट्रीप्ड कोरल स्नेक हा साप महाराष्ट्रातील आंबोली, कोयना, कास पठार, पाचगणी, खंडाळा, भीमाशंकर या पश्चिम घाटातील परिसरात आढळतो. मात्र याच्या शरीरावर दोन ऐवजी तीन ते पाच लांब पट्टे/ रेषा असतात. याची लांबी सरासरी पाऊण ते एक मीटर असते. याचे शास्त्रीय नाव कॅलिऑपिस निग्रेन्स असे आहे. हिंदी त्याला कालाधारी मुंगा असे म्हणतात.


माहिती सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख, ढोलगरवाडी / शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष शेतकरी शिक्षण मंडळ व कार्यकारी संचालक  सर्पोद्यान ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

शब्दांकन / संपादन :- श्रीकांत वै. पाटील, कालकुुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर. संपर्क : ९५५२०४००१५/ ९४२३२७०२२२No comments:

Post a Comment