तांबुळवाडी फाटा ते माणगाव रस्ता गेला चोरीला? - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2020

तांबुळवाडी फाटा ते माणगाव रस्ता गेला चोरीला?

पं. स. मासिक बैठकीत उपसभापती मनिषा शिवनगेकर यांची माहिती .

नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी

         तांबुळवाडी फाटा  ते माणगाव रस्ता चोरीला गेला आहे. या रस्त्यावर १७ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. काम झालेल्या आठ दिवसांत रस्ता पुर्णतः उखडून गेला आहे.या रस्त्यावरून पायी चालत जाणे ही कठीण झाले तर  माणगांव ते लकीकट्टे आणि माणगांव ते माणगांव फाटा या ठिकाणीही मोठ मोठे  खड्डे पडले आहेत.या रस्त्यांची पुन्हा तात्काळ दुरुस्ती करवी अशी मागणी उपसभापती मनिषा शिवनगेकर यांनी आज झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती अँड अनंत कांबळे होते. स्वागत गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनीं केले.प्रारंभी  पं. स. कृषी विभाग कर्मचारी डी. बी. पाटील, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
         चंदगड तालुक्यातील भाऊबंदकी वाद विकोपाला गेले आहेत. वाटणी, मोजणी या वरून चंदगड पोलिस ठाण्यात तक्रारी वाढल्या आहेत. याला जबाबदार मागणीवरूनही वेळेत न मिळणारी मोजणी आणि चंदगड भूमिअभिलेखचे उप अधीक्षक घुले हेच कारणीभूत आहेत. कधीच कामावर हजर नसलेल्या घुले यांच्यावर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात यावेत 
        भूमिअभिलेख उपअधीक्षक कायमच गैरहजर असतात. तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांना विचारले असता ते मिटिंगला गेलेत असे सदानकदा उत्तर मिळते. अशा महिन्यातून मिटिंग असतात तरी किती संतप्त सवाल उपसभापती मनीषा शिवणगेकर यांनी केला. 
         यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे फॉर्म पं. स. कडे जमा केले आहेत, सदर फॉर्म ३१ मार्च पूर्वी समाज कल्याण विभागाकडे पाठवले आहेत. वर्ष होत आले तरी अद्याप मंजुरी मिळाली नाही. वारंवार विचारणा केली असता दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत. या योजनेचा लाभ लाभार्थी पर्यंत पोचले नाहीतर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सदस्यां  विठाबाई मुरकुटे यांनी सांगितले. 
       जिल्हा परिषदेच्या एलबीटी योजनेचे तीन तेरा झाले आहेत. यामुळे लाभार्थी अनेक योजनांपासुन वंचित राहिला आहे. पूर्वी थेट पं स. मधून विना अडथळा लाभ मिळत होता. आता साहित्य खरेदी करून पावती सादर करावी लागते. त्यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. सदर योजना पूर्ववत करावी अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील अनेक पाणी योजना कागदोपत्री ९० टक्के पुर्ण झाल्याचा आभास केला जातो मात्र एकही काम पूर्णत्वाला गेले नसल्याची माहिती मनीषा शिवणगेकर यांनी दिली.
       तालुक्यातील नववी ते बारावीचे वर्ग १०० टक्के सुरू झाले आहेत. विद्यार्थी उपस्थिती  ९५ % आहे. अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची १०० टक्के कोविड चाचणी करण्यात आली आहे. ऊसतोड कामगार व स्थलांतरित बालकांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक शाळेतील एक शिक्षक बाल रक्षक म्हणून काम करीत असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाकडे १२ पदे रिक्त आहेत तर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील कोविड केंद्रांवर गेल्या सत्तावीस दिवसात एकही कोविड रुग्ण मिळाला नाही. त्यामुळे चंदगड तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे आरोग्य अधिकारी आर. के. खोत यांनी सांगितले. महावितरण ची प्रलंबित बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन अभियंता लोधी यांनी केले.  वीज बिले ग्राहकांना भरावी लागणारच आहेत. त्या साठी हप्त्यांची तरतूद करण्यात आली आहे. विद्युत तांत्रीक ची ५० पदे रिक्त आहेत त्यामुळेच महावितरणवर अतिरीक्त काम वाढले आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहेत. रमाई आवास योजनेंतर्गत २०१८-१९ मध्ये ११२ चे उद्धिष्ट होते. पैकी ८९  कामे पुर्ण झाल्याची माहिती सौ.  देशपांडे यांनी दिली.  कोविड कालावधीत एसटी ला मोठा तोटा सहन करावा लागला. अलीकडे चंदगड - बेळगाव चंदगड- कोल्हापूर फेऱ्यामध्ये वाढ झाल्याने ३ लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे आगार प्रमुख गौतम गाडवे यानी सांगितले.अहवाल वाचन संजय चंदगडकर  यांनी केले.  आभार एस. जी. जाधव यांनी मानले. 


No comments:

Post a Comment