विशाल पाटील - कालकुंद्री / सी एल वृत्तसेवा
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कालकुंद्री ता. चंदगड हद्दीतील किटवाड नजीकच्या धरण व धबधब्यावर उन्हाळा सुरु झाला तरी पर्यटकांचा ओघ सुरूच आहे. बेळगाव शहरासह कर्नाटक सीमा भागातून रोज शेकडो पर्यटक येथे गर्दी करत आहेत.
गवतामध्ये फेकून दिलेल्या पत्रावळ्या व पाण्याच्या बाटल्या.आंबोली, स्वप्नवेल पेक्षा नजीकचा 'पिकनिक स्पॉट' झाल्यामुळे सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची ही पहिली पसंती ठरली आहे. बहुतांशी पर्यटक जेवणाचे साहित्य घेऊन येतात व परिसरात स्वयंपाक बनवतात. तर काही जण आणलेले तयार जेवण येथे जेवतात. यामुळे प्लास्टिक पत्रावळ्या, ग्लास, कप, पाणी बाटल्या, यांचा दिवसेंदिवस खच पडत आहे. हा कचरा वाऱ्याने नजीकच्या ऊस, शाळू, जोंधळा, भाजीपाला, जनावरांसाठी राखलेले गवत यात पडत आहे. काही अतिउत्साही पर्यटक दारू बिअरच्या बाटल्या घेऊन येतात. रिकामी झाल्यानंतर तिथेच फेकून किंवा फोडून जातात. याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे.
उन्हाळ्यामुळे कोरडा पडत चाललेला धबधबा.किटवाड नंबर १ धरण व धबधबा हा पूर्णतः कालकुंद्री गावच्या हद्दीत असल्यामुळे धरणाखाली बुडीत तसेच धबधब्यामुळे वाहून गेलेली शंभर टक्के जमीन कालकुंद्री तील शेतकऱ्यांची आहे. धरणातील ओव्हरफ्लो पाण्यामुळे निर्माण झालेल्या धबधब्याला 'कालकुंद्री धबधबा' संबोधण्यात यावे अशी मागणीही बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बुडीत क्षेत्रातून शिल्लक राहिलेल्या तुटपुंज्या जमिनीत येथील शेतकरी भागोजी पाटील- कलागते, शंकर पाटील, तानाजी पाटील, नारायण पाटील, कृष्णा पाटील, नागोजी पाटील, अर्जुन पाटील, वाकोजी पाटील आदी भावकी सह नेताजी पाटील, रामू पाटील, बाबू पाटील आदी नजिकचे शेतकरी पीक काढण्याची धडपड करत आहेत. तथापि अतिउत्साही पर्यटकांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग व संबंधित शासकीय विभागाकडून कायमस्वरूपी होत राहणऱ्या नुकसानीबाबत योग्य उपाययोजना करुन संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment