![]() |
| युवराज पाटील |
कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा गावचा सुपुत्र आणि केशवनगर चिंचवड येथे स्थायिक झालेला एक सामान्य नोकरदार युवराज पाटील आज सायकलिंग क्षेत्रात प्रेरणादायी ठरला आहे. अल्पावधितच १ लाख किमी चा सायकल वरून प्रवास करून सायकल वरून भारत भ्रमंती करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या युवराज पाटील यांची सर्वानी प्रेरणा घेण्यासारखे आहे .
आयटीआय शिक्षणानंतर १९९८ मध्ये नोकरीनिमित्त पुण्यात दाखल झालेल्या या तरुणाने सुरुवातीला ट्रेकिंगची आवड जोपासली.गड-किल्ल्यांवर भटकंती करताना इतिहासाची माहिती मिळवली,व्यायामाची सवय लागली.जंगलभ्रमंती करताना वन्यजीव छायाचित्रणाची आवड निर्माण झाली आणि भारतातील ताडोबा, पेंच, कान्हा, बांधवगड, जिम कॉर्बेट, केदारनाथ, स्पिती व्हॅली, भितरकनिका, कच्छ, अशी अनेक राष्ट्रीय उद्याने त्याने अनुभवली.
कोरोनाकाळ हा सायकलिंग प्रवासाचा टर्निंग पॉईंट ठरला. एक जुनी बेसिक सायकल घेऊन सुरुवात केली तेव्हा १०-२० किमी अंतर पार करतानाही दमछाक व्हायची.पण सातत्याने प्रयत्न करत आजवर तब्बल १ लाख किलोमीटर सायकलिंग पूर्ण केले आहे.या प्रवासात ४३० सेंच्युरी राईड्स आणि ६०० हाफ सेंच्युरी राईड्सचा समावेश आहे.सुरुवातीला पुण्याजवळील दगडूशेठ गणपती, शंकर महाराज मठ, आळंदी, देहू, मोहितेवाडी, कात्रज बोगदा अशी ठिकाणे त्याने सायकलने गाठली. दर आठवड्याला लोणावळा रिटर्न १०० किमी ही त्याची सवय झाली.त्यानंतर तीन वर्षांपासून तो पंढरपूर सायकलवारी करतो आहे. अष्टविनायक दर्शनाचा प्रवासही दरवर्षी चार रविवारात सायकलने पूर्ण करणे हा आता त्याच्यासाठी परंपरागत भाग झाला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात त्याने पुणे–कन्याकुमारी १६०० किमीचा प्रवास कोणत्याही सपोर्टशिवाय पूर्ण केला.या प्रवासादरम्यान गोकर्ण, मुरुडेश्र्वर, गुरुवायर, पद्मनाभस्वामी मंदिर अशा धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पुढे पुणे–सोमनाथ १२५० किमी आणि पुणे–उज्जैन–ओंकारेश्वर–त्र्यंबकेश्वर–पुणे असा १६५० किमीचा ज्योतिर्लिंग दर्शन प्रवास केला. हे प्रवास धार्मिक यात्रांसह स्वतःच्या मानसिक व शारीरिक ताकदीची खरी कसोटी ठरले.
"वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचे,"हा त्यांचा जीवनमंत्र.एका सायकलपासून सुरुवात करून आज त्यांच्या संग्रहात चार सायकली आहेत.कंपनीत आठ-नऊ तास काम करूनही व्यायामाला वेळ देणे आणि उर्जा टिकवून ठेवणे ही त्यांची जिद्द.
आतापर्यंतच्या या सायकल प्रवासात आनंद गुंजाळ, प्रदीप टाके, संदीप परदेशी , संतोष नखाते, बाळासाहेब तांबे, आनंद लोंढे यांची खुप साथ मिळाली. तसेच आयएएस चे गजु भाऊ खैरे, अजित पाटील, भुजबळ साहेब, चाको साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
कोरोना काळात म्हणजे 2020 मध्ये सुरू केलेला सायकल प्रवास 13 सप्टेंबर 2025 रोजी 47 व्या वाढदिवसाचा औचित्य साधून १ लाख किलोमीटर सायकलिंग चा टप्पा पूर्ण केला .यामध्ये टूर डी हंड्रेड या जागतिक स्पर्धेमध्ये युवराज 6 व्यां स्थानावर होते.
सातारा अनबीटेबल रायडर्स यांच्या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. याचबरोबर अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले .या प्रवासात त्यांना थायसेनकृप कंपनीतील सहकारी,सायकलिंग मित्रपरिवार आणि पत्नी अश्विनी व कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
"माझ्याकडून नव्या पिढीसाठी संदेश हा आहे की व्यायाम कोणत्याही प्रकारचा असो –सायकलिंग,रनिंग, वॉकिंग,योगा किंवा ट्रेकिंग–पण तो नियमित केला पाहिजे. सातत्य ठेवल्यास ध्येय गाठणे अवघड नाही.भारतातील नवनवीन स्थळांना सायकलद्वारे भेट देऊन पूर्ण भारतभ्रमण करण्याचा माझा संकल्प आहे. खऱ्या अर्थाने सांगायचेच झाले तर जिद्द,चिकाटी,सातत्य आणि आत्मविश्वासाने सामान्य माणूसही असामान्य ठरू शकतो." - युवराज पाटील (सायकल प्रेमी, केशवनगर चिंचवड)

No comments:
Post a Comment