विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत विद्यार्थी परिषदेचे शिवाजी विद्यापीठ कुलगुरूंना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2025

विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत विद्यार्थी परिषदेचे शिवाजी विद्यापीठ कुलगुरूंना निवेदन

 

शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नां संबंधी कुलसचिव यांच्याकडे निवेदन देताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थी संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू यांना दिले. या मागण्याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    निवेदनात  विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत दिली जाणारी विद्यार्थी पालक शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी कल्याण निधी योजना कार्यान्वित असून या अंतर्गत पालकांच्या नैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यूसाठी विद्यार्थ्यांना निधी दिला जातो. अशा विद्यार्थ्यांनी रीतसर अर्ज केले पण मंजुरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना निधी मिळालेला नाही. परिणामी सुमारे ५९ विद्यार्थ्यांना कल्याण निधीपासून वंचित राहावे लागले. याबाबत कुलगुरू यांनी कल्याण निधी मंजुरीचे पत्र तात्काळ काढून योजनेच्या लाभ विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा.

याशिवाय विद्यापीठात मुलांच्या वस्तीगृहामध्ये जिमखाना सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे. याचे उद्घाटन होऊन अनेक दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना व्यायामासाठी जिमखाना खुला केलेला नाही. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. तरी जिमखाना तात्काळ चालू करण्यात यावा.  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू होऊन चार महिने उलटले तरी मानसशास्त्रीय विभागाच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्रे मिळालेली नाहीत. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी मागणी करूनही काही उपयोग झालेला नाही. ओळखपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथालयात संदर्भ पुस्तके मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. एक दोन महिन्यावर परीक्षा येऊन ठेपलेली असतानाही वाचायला पुस्तके मिळत नसतील तर ही गंभीर बाब आहे. तसेच सदर विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देण्यासाठी प्राध्यापक संख्या कमी असल्याने प्रात्यक्षिके होत नाहीत. अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. याची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेऊन मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा वेदांत कुलकर्णी कोल्हापूर जिल्हा संयोजक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारा बद्दल अभाविप कडून तीव्र निषेध करण्यात आला. 

    विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. टी. एम. चौगुले यांना निवेदन देताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभाग संयोजक दीपक नडमाने, जिल्हा संयोजक वेदांत कुलकर्णी, महानगर मंत्री ऋषिकेश थोरात, जिल्हा सह संयोजक प्रेम राजमाने यांच्यासह विद्यार्थी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment