कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कबड्डी व हॉलीबॉल क्रीडा क्षेत्रात गाव व चंदगड तालुक्याचे नाव अनेक खेळाडूंनी उज्वल केले आहे. अशा जुन्या जाणत्या माजी खेळाडूंचा कोवाड येथील रणजीत देसाई सांस्कृतिक भवन तथा श्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक नेते शंकर मनवाडकर यांच्या सौजन्याने होत असलेला हा गौरव समारंभ रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. अशी माहिती मनवाडकर व शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी दिली.
सोयी सुविधा, प्रशिक्षकांची वानवा, आर्थिक पाठबळाचा अभाव अशा काळात चंदगड तालुक्यातील अनेक कबड्डीपटू व हॉलीबॉलपटूंनी या खेळासाठी योगदान देऊन तालुक्यात या दोन्ही खेळांची परंपरा जिवंत ठेवली व वाढवली. अशा जुन्या जनत्या जाणत्या खेळाडूंच्या प्रती कृतज्ञता म्हणून शंकर मनवाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मनमाडकर यांच्या संकल्पनेतून काही दिवसांपूर्वी तालुक्यातील माजी कुस्तीपटूंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याच धर्तीवर हॉलीबॉल व कबड्डी खेळाडूंचा सन्मान होणार आहे. याप्रसंगी खेळाडूंसह हितचिंतक व क्रीडा प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन मनवाडकर यांनी केले आहे.
चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या हुतूतू व त्यानंतर कबड्डी असे नामकरण झालेल्या खेळात कर्यात भागातील कालकुंद्री, किणी, हुंदळेवाडी ही तीन गावे सातत्याने अग्रेसर होती. यांच्यासोबत कुदनूर, कागणी, शिवणगे या गावांची नावे घ्यावी लागतील. तर हॉलीबॉल खेळात चंदगड तालुक्यातील कालकुंद्री गावचा दबदबा कायम राहिला आहे. गाव मर्यादित कबड्डी व हॉलीबॉल स्पर्धा ठेवल्या तरी कालकुंद्री येथे दोन्ही खेळांचे तब्बल १५-१६ संघ सहभागी होत. यावरून गावात खेळाडूंची संख्या किती असेल याची कल्पना येते. याबरोबरच कार्वे, डुक्करवाडी (रामपूर) ही आदी हॉलीबॉल मध्ये अग्रेसर होती. सद्यःस्थितीत तालुक्यातील अनेक गावातील खेळाडूंनी या दोन्ही खेळांमध्ये प्रगती साधली असली तरी चाळीस वर्षांपूर्वी या खेळांमध्ये योगदान दिलेल्या खेळाडूंचे महत्त्व कमी होत नाही. हा धागा पकडून शंकर मनवाडकर यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचे क्रीडाप्रेमींमध्ये कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment