कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
१४ ऑगस्ट २०२५ रोजी महालक्ष्मी ज्वेलर्स कोवाड, ता. चंदगड येथून हात चलाखीने काउंटरवर ठेवलेल्या ट्रे मधील दोन सोन्याच्या अंगठ्या चोरी करून फरार झालेल्या आरोपीला चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेरबंद केले. कारवाईत चोरटा बाळाप्पा मायाप्पा पट्टणकोडी, राहणार वड्राळ, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव याला बोरगाव कर्नाटक येथे सापळा लावून त्याच्या मुस्क्या आवळल्या.
दुर्गा माता मंदिर जवळच्या महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये मालक दोन गिऱ्हाईकांना दागिने दाखवण्यात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन बाळाप्पा हातचलाखीने दोन अंगठ्यात चोरून पसार झाला होता. ही घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाल्याने चोरट्याचा चेहरा पोलिसांच्या हाती लागला होता. तेव्हापासून चंदगड पोलीस या चोरट्याच्या मागावर होते. दि. २२ रोजी चोरटा एका मालवाहतूक ट्रक मधून आपल्या गावातून चिक्कोडी येथे येत असल्याची खबर मिळाल्याने पोलिसांनी चिंचणी फाटा चिकोडी येथे सापळा लावला. या ठिकाणी संबंधित ट्रकला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न इशारा करताच चोरटा बाळाप्पा पट्टणकोडी हा ट्रक मधून उडी मारून पळून जाऊ लागला. तथापि चंदगड पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुस्क्या आवळल्या व चोरीस गेलेल्या सोन्याच्या अंगठ्या हस्तगत केल्या. चोरट्यावर बीएसएन कलम 303 2 प्रमाणे कारवाई सुरू आहे.
कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे यांच्यासह तुकाराम राजिगरे, पोहेकॉ आनंद नाईक, अजित वाडेकर, चालक पोहेकॉ निरंजन जाधव, पोलीस शिपाई गोविंद जाधव, चालक पोलीस शिपाई युवराज कांबळे, महावीर मानगावे व गायकवाड यांच्या पथकाने कामगिरी फत्ते केली.
या यशस्वी मोहिमेनंतर तालुक्यात घडलेल्या चोरीच्या घटनांमधील चोरट्यांना लवकरच मुद्देमालासकट जेरबंद केले जाईल. याबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

No comments:
Post a Comment