संपत पाटील / चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड- गडहिंग्लज मार्गावरील सातवणे या गावाने काही वर्षांत गणेशोत्सवात घरगुती देखावे उभे करून लक्ष वेधले आहे. तांत्रिक देखावे उभारण्यासाठी अनेक कुटुंबे लाखो रुपयांचा खर्च करतात. सुंदर देखावे आणि आकर्षक गणेश मूर्ती हे त्यांचं खास वैशिष्ट्य असते. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, हुक्केरी तालुक्यातून व बेळगाव सीमा भागातील हजारो गणेश भक्त देखावे पाहण्यासाठी हजेरी लावतात. घरगुती गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर अनंत चतुर्दशी पर्यंत हे देखावे खुले असतात. गणपतीच्या मूर्तीसाठी मखर सजावट ही पूर्वपार परंपरा स्थानिक नैसर्गिक साधनांचा वापर करून केले जायचे हळूहळू बाजारात कृत्रिम साधनांचा वापर वाढल्याने मखर सजावट हा प्रतिष्ठेचा भाग बनला आहे. त्याहुनी पुढं जात घरगुती गणपती सहा फुटापासून आठ फुटापर्यंत घरासमोर मंडप उभा करून आकर्षक सजावट लाइटिंग असे स्वरूप दिले आहे. हे सर्व देखावे गणेश मुर्त्या कोल्हापुर इचलकरंजीहून आणल्या जातात. यासाठी दहा हजारापासून ५० हजारापर्यंत खर्च केला जातो.
या उपक्रमाची सुरुवात मंडळापासून झाली. गावात दोन मंडळे असून घरगुती देखावे एकाचे बघून दुसऱ्याने करत करत असे करता करता ही सुरुवात गावातील दलित वस्ती पर्यंत पोहोचली आहे. दलित वस्ती सुध्दा बाप्पाच्या जयघोषात दुमदुमू लागली आहे. अनेकांनी आपल्या गणपतीला सार्वजनिक स्वरूप द्यायला सुरुवात केली आहे. सातवणेेे येथील गणेेश मूर्ती आणि तांत्रिक देखाव्यांची ख्याती कर्नाटक, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्या पर्यंत पोहोचली आहे. अनेक जण खास गाड्या करून आपल्या कुटुंबासोबत गणेशाचे दर्शनासाठी इकडे तिकडे रीघ लावतात.
गावात सार्वजनिक मंडळांसह मारुती जाधव, अनंत जाधव, कृष्णा सुतार, दत्तू पाटील, दशरथ गाडे, रघुनाथ पारसे, दत्तू गावडे, नितीन पारसे, परशराम गुरव, दिगंबर करते, गोविंद रेडेकर, पांडुरंग रेडेकर, अमर जाधव, तानाजी पारसे, विलास कांबळे, राजू कांबळे, राहुल कांबळे, निवृत्ती कांबळे, साहिल कांबळे आदी ग्रामस्थांनी कौटुंबिक स्तरावर देखावे सादर केले आहेत.
सातवणे मधील सर्व ग्रामस्थ दूरवरून येणाऱ्या गणेश भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. पार्किंग व्यवस्था, पिण्याचे शुद्ध आणि मुबलक पाणी, स्वच्छतागृह, खाद्यपदार्थांचे स्टॉल या अनुषंगाने ग्रामपंचायत ने नियोजन ठेवले आहे.
या उत्सवा संबंधी बोलताना सातवणे येथील ग्रामस्थ नागेश गुरव म्हणाले, देखणी मूर्ती, मखर सजावट, हलता देखावा यावर हजारोंचा खर्च केला जातो. ते पाहण्यासाठी दूरवरचे लोक गावाला भेट देतात. गावचा नावलौकिक वाढतो यातच समाधान आहे. हा आनंद पैशात मोजता येत नाही. अशी येथील लोकभावना झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
सातवणे येथे मारुती जाधव यांच्या घरी ग्रामीण जीवनाचे सार अधोरेखित करणारा तांत्रिक देखावा उभारण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment